मुंबई (रवींद्र मालुसरे ) : देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून महाराष्ट्रात सुरु झालेली मराठीतील पत्रकारिता आणि त्यातील निर्भीडता याचा आज संबंध आजच्या पत्रकारितेत दिसत नाही. ती वैभवशाली पत्रकारिता अलीकडे लोप पावत चालली आहे. गोदी मीडियाचे पेव फुटले आहे. पत्रकारिता म्हणजे समाजाला आरसा दाखवावा, आपल्या दैनिकातून समाजाला दिशा दाखवावी, जे घडले आहे त्याची वस्तुस्थिती निर्भीडपणे व्यक्त व्हावी परंतु अपवादात्मक विशेषतः ग्रामीण भागातून अशी पत्रकारिता दृष्टीस पडते आहे. खरे तर जगातले प्रगत राष्ट्र म्हणून महाराष्ट्राची दखल घेतली गेली आहे. आपल्या राज्याची पुरोगामी अशी प्रतिमा आहे. म्हणूनच आम जनतेकडून सत्य कथन व्हावे, बातमीतून लोकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडावेत अशी अपेक्षा व्यक्त होत असते. असे उदगार शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी काढले.
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत वामन पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सोहळा माहीम येथे आयोजित करण्यात आला होता. देसाई पुढे असेही म्हणाले की, हल्ली वैचारिक प्रदूषण सर्वत्र दिसते आहे. चंद्रकांत पाटणकर यांनी आयुष्यभर वर्तमानपत्रातून लेख लिहिली त्यापेक्षा अधिक मुंबईच्या विविध प्रश्नावर सडेतोड वाचकांची पत्रे लिहीली, विषयांचा पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांच्या दीपस्तंभासारख्या सेवाकार्याची दखल घेऊन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, शिवसेना माहीम विभाग, दैवज्ञ समाजोन्नती परिषद, नामदार नाना शंकरशेठ प्रतिष्ठान, दैवज्ञ हितवर्धक समाज दादर या संस्थांच्या वतीने त्यांच्या प्रतिभेचा सन्मान होत आहे. माझ्या हातून त्यांचा सत्कार आणि त्यांच्या पत्रपंढरी भाग ३ चे प्रकाशन होत आहे. यापूर्वी शिवसेना नेते स्वर्गीय दत्ताजी साळवी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या हस्ते पहिल्या आणि दुसऱ्या भागाचे प्रकाशन झाले होते. आज मी खासदार म्हणून नव्हे तर शिवसैनिक म्हणून माझे भाग्य समजतो.
आमदार महेश सावंत आपल्या भाषणात म्हणाले की, वृत्तपत्रलेखनातील आणि समाजातील कार्य पाटणकर यांच्या हातून निरलसपणे घडले आहे. वृत्तपत्र लेखक हा सरकारला जाब विचारणारा हवा. पत्रकारिता सामान्य माणसाची बाजू मांडणारी हवी. सरकारी कायद्यांमध्ये ज्या पळवाटा आहेत त्यांचा मागोवा घेऊन त्या बंद करायला लावणारी हवी. सकारात्मकता, परखड निर्भीड लेखन, समाज प्रबोधन हे संपून जमाना लोटलेला आहे. आता सोशल मीडियावर व्यक्त होणे सर्वसामान्यांसाठी फायद्याचे आहे. नवनवीन प्लॅटफॉर्मचा धाक निर्माण झाला आहे. समाजातील प्रश्न मांडण्यासाठी तरुणांनी त्याचा पुरेपूर वापर करावा.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे म्हणाले की, पाटणकर यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, शिवसेना माहीम विभाग, दैवज्ञ समाज दादर आपल्या कुटुंबातील समजतात. वृत्तपत्र लेखकांचे विद्यापीठ म्हणून ख्याती असलेल्या वृत्तपत्र लेखक संघाच्या वाटचालीत पाटणकर हे आम्हा सभासदांसाठी दीपस्तंभ आहेत.
कार्यक्रमात मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, माजी महापौर मिलिंद वैद्य, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सौ. सुहासिनी चंद्रकांत पाटणकर, जयदीप ठाकरे यांची भाषणे झाली. ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनील कुवरे, सौ.सोनाली जयदीप ठाकरे, सौ. दर्शना वृषाल फडणीस आणि दिगंबर चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सुप्रसिद्ध गायक अनिल पोकळे यांनी सुरुवातीला श्रीगणेश वंदना सुरेल आवाजात म्हणाले. तर सूत्रसंचालन माहीम विधानसभा संघटक शिवसेना (उबाठा) राजू पाटणकर आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे प्रमुख कार्यवाह, प्रशांत घाडीगावकर यांनी केले. कार्यक्रमाला माजी नगरसेवक ॲड. मनमोहन चोणकर, वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष विजय कदम, ज्येष्ठ शिवसैनिक सुबोध महाले, साहित्यिक भारत हर्ष (हर्षद पुजामाधव मदन), ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अरुण पां. खटावकर, पत्रकार राजन वसंत देसाई, डॉ विवेक रामचंद्र रायकर, विनीत पद्माकर पाटणकर, सौ .राजश्री आनंद आरोलकर, चंद्रशेखर कमळाकर दाभोळकर, गीतांजली मालडिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
