अति ‘सुंदर’ गोलंदाजीने भारत विजयी

Washington Sundar Suryakumar Yadav

ऑस्ट्रेलिया वि. भारत टी-२० मालिका: चौथ्या सामन्यात यजमानांना ११९ धावांत गारद करत भारताने ४८ धावांनी सामना जिंकला.

क्वीन्सलँड (प्रतिनिधी): वॉशिंग्टन सुंदरच्या केवळ तीन धावांत तीन बळींच्या जोरावर भारताने चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. भारताच्या १६७ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या कांगारूंना चांगली सुरुवात मिळूनही भारताच्या गोलंदाजांपुढे तग धरता आला नाही. ११९ धावांवर ऑल-आउट होत २०,४७० प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारताविरुद्ध आपल्या देशात पहिली टी-२० मालिका जिंकण्याचे स्वप्न अजूनही स्वप्नच राहिले.

मिचेल मार्शने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावत भारताला पुन्हा एकदा फलंदाजीस आमंत्रित केले. टी-२० प्रकारात आपली झाप सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शुभमन गिलने काही काळ खेळपट्टीवर आपली बाजू सेट करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अभिषेक शर्माने पुन्हा एकदा फटकेबाजीने सुरुवात करीत धावा जमवण्यास सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकीय भागीदारी केल्यानंतर ऍडम झाम्पाने अभिषेकला आपल्या जाळ्यात फसवले व भारताला पहिला हादरा दिला. भारताने शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर बढती देत आपला गेम-प्लॅन आखला. दुबे मोठे फटके मारण्यास समर्थ असल्यामुळे, शिवाय डावखुरा फलंदाज बाद झाल्यामुळे क्रीजवर दुसऱ्या डावखुऱ्या फलंदाजाला पाठवून गोलंदाजांना अडचणीत टाकण्याची रणनीती भारताने आमलात आणण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. १८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या दुबेचा अडथळा नॅथन एलिसने दूर करीत भारताला आणखी एक धक्का दिला.

मागील काही सामन्यांपासून फॉर्मशी झगडणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवला या सामन्यात आपली लय पकडणे अत्यावश्यक होते. त्याने आपला नैसर्गिक खेळ चालू करत १३व्या षटकात झाम्पाला दोन सलग षटकार ठोकले. पण त्याची ही इंनिंग फार काळ टिकू शकली नाही. १६व्या षटकात झेवियर बार्टलेटला मोठा फटका मारण्याच्या नादात टीम डेव्हिडकडे झेल देत केवळ २० धावांवर तंबूत परतावे लागले. तिकडे गिलने सावध पवित्रा घेत ३९ चेंडूंत ४६ धावांची खेळी केली. अधून-मधून विकेट्स जात असताना अक्षर पटेलने आठव्या क्रमांकावर येत ११ चेंडूंत नाबाद २१ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक १६७ धावांपर्यंत मजल करून दिली.

प्रतिउत्तरादाखल उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पावरप्लेमध्ये एक गडी गमावत ४८ धावा केल्या अक्षर पटेलने पाचव्या षटकात मॅथ्यू शॉर्टला पायचीत पकडत भारताला पहिला विकेट मिळवून दिला. पंचांनी सुरुवातीला नाबाद घोषित केले होते. पण सूर्यकुमारने तिसऱ्या पंचांकडे दाद मागत हा विकेट मिळवला. टी-२० क्रिकेटमध्ये मोठे फटके मारण्याच्या नादात बडे-बडे संघही बिथरून जातात. मग सहज-सोपा वाटणारा विजय कठीण होऊन जातो किंवा पराभवाचा सामना करावा लागतो. त्याचीच प्रचिती आज ऑस्ट्रेलियाला आली.

ग्लेन मॅक्सवेलच्या संघात परतण्यामुळे फलंदाजीत आलेली बळकट भारतीय गोलंदाजांना उरून पुरेल असे वाटत असताना भारताच्या चलाख गोलंदाजांनी बिग-हिटर्स कांगारूंना लालच देत आपल्या जाळ्यात अडकवले. शिवम दुबेने आपल्या कामचलाऊ गोलंदाजीने कर्णधार मार्श (३०) व टीम डेव्हिड (१४) यांना बाद करीत कांगारुंची मधली फळी हादरवली. अर्शदीपने जोस फिलिपचा अडथळा दूर करत धावफलकावर शंभरी पार होण्याआधी निम्मा संघ माघारी परतवला. लगेचच विस्फोटक वाटणाऱ्या मॅक्सवेलला वरून चक्रवर्तीने दोन धावांवर त्रिफळाचित करीत भारताचा विजय निश्चित केला. उरलेली जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरने पार पाडली. त्याने केवळ आठ चेंडू टाकत तीन धावा देत तीन फलंदाजांना बाद करत भारताला विजय मिळवून दिला. बुमरानेही बेन डॉरशिसचा त्रिफळा उडवत एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

भारत १६७/८ (२०) – शुभमन गिल ४६ (३९), अभिषेक शर्मा २८ (२१), नॅथन एलिस ४-०-२१-३

ऑस्ट्रेलिया ११९/१० (१८.२) – मिचेल मार्श ३० (२४), मॅथ्यू शॉर्ट २५ (१९), वॉशिंग्टन सुंदर १.२-०-३-३

भारत ४८ धावांनी विजयी

सामनावीर – अक्षर पटेल