भारत विश्वविजेता, महिला क्रिकेटला मिळाला नवा चॅम्पियन

India Womens Team after winning world cup 2025

महिला विश्वचषक २०२५: दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करीत भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला.

नवी मुंबई (भास्कर गाणेकर): नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या मैदानात भारतीय महिलांनी क्रिकेट विश्वात इतिहास घडवत पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरले. ४६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूंवर दीप्ती शर्माच्या चेंडूवर मागे धावत जात हरमनप्रीतने भन्नाट झेल घेत ३५,२०० प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारताला आपला पहिला विश्वचषक जिंकून दिला. २०१७ ला हातातोंडाशी आलेल्या विजयाने पाठ दाखवल्याने यंदाच्या घरच्या मैदानांवर टट्रॉफीवर आपले नाव कोरण्याचा उद्देशाने उतरलेल्या भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान रोखत चमचमत्या करंडकावर आपले नाव कोरले.

भारताचे २९९ धावांचे आव्हान पेलण्यास उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला नेरूळच्या स्टेडियमवर इतके कठीण नव्हते. सेमी फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचे ३३८ धावांचे आव्हान पूर्ण केले होते. त्या अनुषंगाने भारताला आफ्रिकेला आउट करत विजय मिळवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणे गरजेचे होते. ५१ धावांची सलामी भागीदारी रचल्यानंतर अमानज्योतच्या एका डायरेक्ट हिटवर ब्रिट्स आउट झाली. लगेचच श्री चरणीने बोसला शून्यावर आउट करीत आफ्रिकेला दुसरा हादरा दिला. कर्णधार लॉराने एका बाजूने खिड लढवत धावांचा पाठलाग काटोकाट सुरु ठेवला. तिने ४५ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावत सुने लूससोबत आणखी एक अर्धशतकीय भागीदारी रचली. भारताला विजय मिळवण्यासाठी विकेट्सची गरज होती तर आफ्रिकेला भागीदारीची. लूस बाद झाल्यानंतर मारिझन काप (४) आणि सिनालो जाफटा (१६) यांना बाद करीत भारताने आपली पकड मजबूत केली. मुख्य म्हणजे सलामीवीर शफाली वर्माला हरमनप्रीतने योग्य वेळी वापरात चांगले ब्रेकथ्रू मिळवून दिले. उरलेली कसर दीप्ती शर्माने पूर्ण करीत आफ्रिकेचा डाव २४६ धावांत गुंडाळला. लॉरा वॉलवोर्टने ९६ चेंडूंत आपले शतक झळकावत काही अंशी सामन्याची सूत्रे फिरवण्याचे काम केले. पण दीप्तीच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना टिकता आले नाही. दीप्तीने अर्धशतकानंतर ३९ धावा देत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद करत भारताचे नाव पहिल्यावहिल्या विश्वचषक कोरले.  

पावसाने खेळाला लपंडाव

डी वाय पाटील स्टेडियम परिसरात दुपारी एक वाजताच पावसाच्या हलक्या सरी बरसायला चालू झाल्या. या सरींचे रूपांतर काहीच काळात मोठ्या पावसात झाले. त्यामुळे निर्धारित वेळेत २:३० चा टॉस ३:०० वाजता करण्याचा निर्णय झाला. काही वेळ तर सूर्यदेवतानेही दर्शन देत सामना लवकर सुरु होईल अशी भाबडी आशा दाखवली. तीन  वेळेस मैदानातील कर्मचाऱ्यांनी कव्हर्स टाकत-काढत कसरत केली. शेवटी दुपारी ४:३२ नाणेफेक होत सामना पाच वाजता सुरु झाला.

शफालीचा झंजावत

एकदिवसीय क्रिकेटमध्ये फॉर्मशी झगडत असलेल्या शफाली वर्माला जखमी प्रतीका रावलच्या जागी संधी मिळाली आणि तिने त्या संधीचे सोने केले. सेमी फायनलमध्ये स्वस्तात माघारी परल्यानंतर तिने फायनलमध्ये आक्रमक पण तितकीच संयमी खेळी केली. स्मृती मानधना सोबत पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केल्यानंतर सेमी फायनलची हिरो जेमिमा रॉड्रिग्ससोबत दुसऱ्या विकेटसाठी ६२ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. शतकाकडे आगेकूच करत असताना मिड-ऑफच्या वरून चौकार खेचण्याचा नादात ती बाद झाली. तिने ७८ चेंडूंत सात चौकार व दोन षटकार ठोकत ८७ धावांची खेळी केली.

भारताची २९८ धावांपर्यंत मजल

शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी सावध पण तितकीच उत्तम सुरुवात देत भारताला शतकीय भागीदारी रचून मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केली. काहीशी नशीबवान ठरलेल्या शफालीने स्मृती बाद झाल्यानंतर जेमिमा सोबतही अर्धशतकीय भागीदारी केली. स्मृती चांगल्या टचमध्ये दिसत असताना मोठा फटका मारण्याच्या नादात किपर जफ्ताकडे झेल देत ४५ धावांवर माघारी पतरली. सेमीफायनलमध्ये चौफेर फटकेबाजी केलेल्या जेमिमाला आज मात्र मोठी इंनिंग करता आली नाही. तिला खाकाने २४ धावांवर बाद केले. भारत साडे तीनशेकडे आगेकूच करेल असे दिसत असताना मधल्या षटकांत धावगतीवर ब्रेक लागला. आघाडीच्या चारही फलंदाजांनी आपली विकेट्स गमावत १६५ धावा केल्या. हरमनप्रीत २० धावांवर बाद होताच पुढची सूत्रे दीप्ती शर्माने आपल्या हाती घेतली. हरमन सोबत ५५ धावांची, अमानज्योत सोबत २२ धावांची व रिचा घोषसोबत ३५ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी करत भारताला एका समाधानकारक धावसंख्येकडे आणले. दीप्ती २० धावांवर असताना पायचीत बाद दिले होते. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर तिला जीवदान मिळाले. ३८ धावांवर असतानाही तिला एक जीवदान मिळाले. रिचाने आपल्या ‘बिग हिट्स’ चा नजराणा पेश करीत २४ चेंडूंत दोन षटकार व तीन चौकार खेचत ३४ धावांचे योगदान दिले. तिलाही ३२ धावांवर एक जीवदान मिळाले.  

तिकिटांचा घोळच

भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर महिला क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी व आपल्या लाडक्या क्रिकेटर्सना जवळून पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांनीही इच्छा दर्शवली. मात्र ऐन फायनलच्या वेळेस बऱ्याच प्रेक्षकांना विना तिकीट परतावे लागले. ऑनलाईन तसेच डी. वाय. पाटील स्टेडियमच्या तिकीट काउंटरवर ‘सोल्ड आउट’ असे फलक अगदी शनिवारपासूनच लावण्यात आल्यामुळे नवी मुंबई व आसपासच्या परिसरातील क्रिकेट रसिकांना निराश होत खाली हात परतावे लागले. ज्या प्रेक्षकांनी सेमी फायनल व फायनलच्या आधी तिकिटे घेतली होती त्यांना मात्र या सामन्याचा अनुभव घेता आला.  

रोहित शर्माची हजेरी

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने महिला क्रिकेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी फायनलमध्ये डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हजेरी लावली. मोठ्या स्क्रिनवर जेव्हा त्याला दाखवण्यात आले तेव्हा समस्त प्रेक्षकांनी ‘मुंबईचा राजा रोहित… रोहित…’ अश्या घोषणांनी मैदान गाजवले. आयसीसी चेयरमन जय शहा यांनीही या सामन्यास हजेरी लावली.  

संक्षिप्त धावफलक

भारत २९८/७ (५०) – शफाली वर्मा ८७ (७८), दीप्ती शर्मा ५८ (५८), आयबॉन्गा खाका ९-५८-०-३

दक्षिण आफ्रिका – २४६/१० (४५.३), लॉरा वॉलवोर्ट १०१ (९८), अनेरिया ड्रेक्सन ३५ (३७), दीप्ती शर्मा ९.३-०-३९-५

भारत ५२ धावांनी विजयी