रणजी चषक: राहाणेच्या तडाखेबंद शतकाने मुंबई सुस्थितीत

Ajinkya Rahane hundred in Ranji Trophy 2025-26

भारताचा माजी कर्णधार अजिंक्य राहाणेने दमदार १५९ धावा करीत मुंबईला छत्तीसगढ विरुद्ध ४०० धावांचा पल्ला गाठून दिला. पावसाच्या व्यत्ययामुळे दिवसभराची षटके पूर्ण होऊ शकली नाही.

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय कसोटी संघातून वगळलेला माजी कर्णधार अजिंक्य राहाणे मुंबईसाठी पुन्हा धावून आला. जम्मू काश्मीरविरुद्ध पहिला सामना जिंकल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या मुंबई संघाने बीकेसी येथे चालू असलेल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात छत्तीसगढविरुद्ध भक्कम स्थितीत नेले. काल सिद्धेश लाडसोबत १६५ धावांची भागीदारी केल्यानंतर आज राहाणेने आपला खेळ चालू ठेवत दीडशेचा पल्ला गाठला.

काल छत्तीसगढ़ने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काहीशी अडखळत सुरुवात झाल्यानंतर राहाणे प्रथम सिद्धेश (८०) सोबत व नंतर शम्स मुलानी (३९) आणि आकाश आनंद (ना. ६०) यांच्यासोबत छोट्या-छोट्या भागीदाऱ्या रचत मुंबईला सुस्थितीत आणले. आपल्या कसोटी क्रिकेटचा अनुभव पुरेपूर वापरात त्याने एकहाती किल्ला लढवला. काल ११८ धावांवर रिटायर हर्ट होऊन परतल्यानंतर आज त्याने चांगला खेळ केला.

मुंबई व आसपास परिसरात चालू असलेल्या परतीच्या पावसाचा परिणाम याही रणजी सामन्यावर झाला. दिवसभरातील जवळपास ५० षटके पावसामुळे वाया गेली. पहिला सामना जिंकल्याने याही सामन्यात किमान पहिल्या डावाच्या आघाडीवर अंक घेण्याचा मनसुबा मुंबई संघाचा असेल. दिवसाखेरीस मुंबई आठ बाद ४०६ धावांवर पोचला होता. छत्तीसगढकडून आकाश सरवतेने चार तर रवी किरणने तीन गडी बाद केले होते.