महिला विश्वचषक स्पर्धेच्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडकडून दारुण पराभव स्वीकारत न्यूझीलंड संघाने स्पर्धेचा शेवट केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात इंग्लंडने आठ गडी व १२४ चेंडू राखत विजय मिळवला.
विशाखापट्टणम (प्रतिनिधी): भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या न्यूझीलंडला आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने एकतर्फी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला चारीमुंड्या चित्त करीत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली. शिवाय अंकतालिकेत दुसऱ्या स्थानी झेपही घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंड संघाला काहीशी चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु या चांगल्या सुरुवातीचे रूपांतर त्यांना मोठ्या धावसंख्येत करता आले नाही. दोन सामने पावसामुळे रद्द झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. शिवाय भारतीय संघानेही मोठा विजय संपादन करीत त्यांच्या स्पर्धेतील आशा संपुष्ठात आणल्या होत्या. त्या अनुषंगाने आजच्या सामन्यात त्यांना करण्यासारखे काही खास नव्हते.
जॉर्जिया प्लिमर (४३) व अमेलिया कर (३५) यांच्या अर्धशतकीय भागीदारीनंतर डाव सावरेल असे दिसत होते. पण इंग्लंडच्या कसलेल्या गोलंदाजीसमोर उर्वरित फलंदाजांना फार काळ तग धरता आला नाही. कर्णधार सोफिया डिव्हाईन (२३), जी आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधला शेवटचा सामना खेळत होती, तिलाही मोठी धावसंख्या उभारून आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड करता आला नाही. इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत न्यूझीलंडला १६८ धावांत गारद केले.
सोफी डिव्हाईनचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढवलेल्या न्यूझीलंडची अष्टपैलू कर्णधार सोफी डिव्हाईन हिने एकदिवसीय क्रिकेटला अखेर बाय-बाय केले. ३६ वर्षीय डिव्हाईनने १५८ एकदिवसीय सामने खेळात न्यूझीलंडसाठी ४००० हुन अधिक धावा व १०० हुन अधिक बळी टिपले. अशी अष्टपैलू कामगिरी करणारी ती केवळ तिसरी खेळाडू ठरली आहे. याही स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान तिने मिळवला. सात सामन्यांत २८९ धावा करीत तिने आतापर्यंत यादीत पाचवे स्थान फटकावले आहे. तसेच न्यूझीलंडसाठी सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तिने दुसरे स्थान कायम ठेवले आहे.
सोफी डिव्हाईन न्यूझीलंडसाठी केवळ क्रिकेटच नाही तर हॉकीही खेळली आहे. २०११ ते २०१३ दरम्यान क्रिकेटमधून काही काळ आराम घेत तिने हॉकीमध्ये आपले नशीब आजमावले. तिच्या नावे अनेक विक्रम आहेत. यातील एक म्हणजे तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक ते ११ या सर्व स्थानांवर फलंदाजी केली आहे. असा विक्रम महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ पाच खेळाडूंनाच करता आला आहे.
१६९ धावांचं माफक आव्हान इंग्लंड ३०व्या षटकातच पूर्ण केले. ऍमी जोन्स व टी. बिमाऊंट यांच्या ७५ धावांच्या सलामी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने दणक्यात सुरुवात केली. बिमाऊंट माघारी परतल्यानंतर ऍमी जोन्सने ७१ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हेदर नाईटने ३३ धावांचे योगदान देत पाठलाग सुकर केला. ऍमी जोन्सने शेवटपर्यंत नाबाद राहत ३०व्या षटकात इंग्लंडला विजय मिळवून दिला. तिने ९२ चेंडूंत ११ चौकार व एक षटकार खेचत नाबाद ८६ धावांची खेळी केली.
