मुख्याध्यापक श्री.शरद उद्धवराव जंगाले सरांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ !

शिक्षक असण्याची पहिली अट ‘विद्यार्थी’ असणे हीच आहे – विलासराव देशमुख

अक्कलकोट (रवींद्र मालुसरे) : माणसांचं मोठेपण तो किती मोठा झाला यापेक्षा त्याने किती लोकांना मोठे केले यावर त्यांचे मोठेपण मोजले जाते. शिक्षण देणे हे आपल्या जीवनाचे धेय्य आहे आणि ज्ञानदानाचे समर्पण करणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे मनोमन स्वीकारलेल्या जंगाले गुरुजींच्या शैक्षणिक सेवा कार्याची महानता भावी पिढीला आदर्शवत अन प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.

शिक्षण हे संस्कृती संवर्धनाचे साधन आहे, तर शिक्षक हा संस्कृतीचा साधक आहे. ही वृत्ती सरांनी आयुष्यभर जोपासली त्याचा मी गेल्या चार दशकांचा साक्षीदार आहे असे उदगार मराठा मंदिर या संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख यांनी काढले. मराठा मंदिर श्रीमंत राणी निर्मला राजे कन्या प्रशाला अक्कलकोट या शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद उद्धवराव जंगाले सरांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात ते बोलत होते.

मोठया संख्येने उपस्थित असलेल्या नागरिक आणि शिक्षकांसमोर जग आणि आधुनिक शिक्षण पद्धती झपाट्याने बदलत असल्याचे मत मांडताना ते आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले की, विद्यार्थी जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तसा, शिक्षकही निव्वळ ‘अर्थार्जनाचे’ साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहाणारा असता कामा नये. ‘शिक्षक’ असण्याची पहिली अट ‘विद्यार्थी’ असणे हीच आहे.
झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत अद्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे.

आज शिक्षणाचे अवमुल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. आमच्यावेळी हे कॉम्प्युटर – मोबाईल नव्हते पण मान मर्यादा आणि पावित्र्य होते. आजचा विद्यार्थी संगणकीय तंत्रज्ञान सहज साध्य करून देशापरदेशात अधिक उच्च पदावर पोहोचत आहे. मात्र गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना सध्या लोप पावत आहे. आपल्या मराठा मंदिरच्या मुंबई, अक्कलकोट, जत, पाली, रत्नागिरी येथील सर्व संस्थामधील संस्थाचालक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी परस्परांना पूरक अशी सामंजस्याची भूमिका घेत यशस्वी वाटचाल करीत आहोत त्याचे दृश्य परिणाम दिसत असल्यामुळे उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी मराठा मंदिर मुंबई या संस्थेचे अध्यक्ष योगेश शशिकांत पवार हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यावर्धिनी मराठा मंदिर मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष संतोषजी नलावडे, चिटणीस मनोहर साळवी, म.मं.श्री. शहाजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश फडतरे, विद्यमान मुख्याध्यापक राजेश पडवळकर, म.मं. श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला अक्कलकोट या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक मानसिंग ल. बनसोडे,
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, मुंबईचे उद्योजक ऍड. यश घोसाळकर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभयजी खोबरे,
शहाजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी. जी. शिंदेआदी मान्यवर उपस्थित होते. जांगळेसरांवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी याप्रसंगी त्यांच्या कार्याला उजाळा दिला आणि निवृत्ती नंतरच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमावर ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ असा भाव दिसून येत होता.

सत्काराला उत्तर देताना जंगाले सर भावुक शब्दात म्हणाले, शाळेशी माझ्या सोनेरी आठवणी जोडलेल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीसाठी, त्याचा पहिला कामाचा अनुभव खूप मौल्यवान असतो. या शाळेने मला शिक्षक म्हणून शिकवण्याची पहिली संधी दिली. त्यावेळी मी नवीन होतो आणि अनुभव नव्हता. पण त्यावेळच्या आमच्या संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापकांनी मला नेहमीच साथ दिली. मुलांना नीट कसे शिकवायचे, कमकुवत मुलांना वाचन आणि लेखन कसे शिकवायचे या सर्व महत्त्वाच्या गोष्टी मला सांगितल्या. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिले. हे सर्व विद्यार्थी माझे विद्यार्थी नसून माझ्याच मुलांसारखे होते. त्यांना नवीन कौशल्ये शिकवली, त्यांना त्यांचे सर्व ज्ञान निरपेक्षपेपणे देण्याचा आणि उत्तम शिक्षण देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला.
गेल्या काही वर्षात तर मराठा मंदिर विद्यावर्धिनी कमिटीच्या वतीने सर्वांनी फार प्रेम दिले आपुलकी दिली. आम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. आम्हाला अधिक शिस्तीने मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शंभुराजे गाटे सर, सौ.अर्चना जाधव मॅडम, तर आभार प्रदर्शन सौ.स्मिता जगदाळे मॅडम यांनी केले.का र्यक्रम आयोजन करण्यात आणि यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मानसिंग बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.मनिषा मोरे मॅडम, सौ.प्रमिला पाटील मॅडम, सौ.रेखा चव्हाण मॅडम, सौ.मनिषा तेलगावकर मॅडम, श्री.शहाजी सावंत सर, श्री.विक्रांत गोडसे सर, शिक्षकेतर कर्मचारी श्री.राजेंद्र गोंडाळ, श्रीमती.शारदा साळुंके यांनी विशेष मेहनत घेतली.