रिकेलटन, सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीनंतर गोलंदाजांनी राखलेल्या सातत्यामुळे मुंबई इंडियन्सला सलग पाचवा विजय साजरी करता आला. लखनऊविरुद्ध विजयाचा दुष्काळ संपवत सातव्या सामन्यात मिळवला पहिला विजय.
मुंबई (प्रतिनिधी): पहिल्या पाच सामन्यांत चार वेळेस पराभवाची चव चाखल्यानंतर विखरून न जाता मुंबई इंडियन्सने पुढील पाच सामन्यांत पाच दणदणीत विजय मिळवत आपण इंडियन प्रीमियर लीगचे बादशाह आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. २१६ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला ५४ धावांनी पराभूत करत अंकतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
रिषभ पंतकडून फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या दोन षटकांत रायन रिकेलटनने येथेच्छ समाचार घेतल्यानंतर रोहित शर्माने सलग दोन षटकार खेचत १९,००० विद्यार्थ्यांना भलतेच खुश केले. पण त्याची हि खेळी पुढील दोन चेंडूंतच समाप्त झाली. आज आपल्या लाडक्या रोहितला वानखेडेवर पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र रोहितने काहीसे निराश केले. रिकेलटनने विल जॅक्सच्या मदतीने पन्नास धावांची भागीदारी करीत मुंबई इंडियन्सच्या मोठ्या धावसंख्येचे मनसुबे स्पष्ट केले.
रिकेलटन हंगामातील आपले दुसरे अर्धशतक लगावून बाद झाल्यांनतर मुंबईचा सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मुंबई इंडियन्ससाठी धावून आला. या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दहाच्या दहा सामन्यांत सातत्य राखत त्याने सर्वाधिक धावा करण्याचा किताब आपल्या नावे केला. मोसमातील तिसरे अर्धशतक पूर्ण करीत त्याने ऑरंज कॅप फटकावली. तेराव्या षटकात मारलेला सूपला शॉट प्रेक्षकांनी चांगलाच अनुभवाला. नमन धीर (२५*) आणि मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करणारा कॉर्बिन बोस (२०) यांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने २१५ धावांची मजल मारली.
प्रथम फलंदाजी करताना २०० धावा केल्यानंतर मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासात एकदाही पराभूत झालेली नाही. आजही एकदा चॅम्पियन्स संघासारखा खेळ पेश करीत लखनऊ सुपर जायंट्सला १६१ धावांत रोखत त्यांच्याविरुद्धचा विजयाचा दुष्काळ संपुष्ठात आणला. उभय संघांत आतापर्यंत झालेल्या सहा लढतींत एलएसजीने प्रत्येक वेळेस बाजी मारली होती. त्यात वानखेडेवरील दोन सामान्यांचाही समावेश होता.
आज मात्र मुंबई इंडियन्सचा दिवस होता. १९,००० हुन अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रदर्शन करताना मुंबईच्या सर्वच खेळाडूंमध्ये एक वेगळी ऊर्जा दिसून येत होती. फलंदाजी, गोलदांजी शिवाय क्षेत्ररक्षणातही अचूक कामगिरी करीत मुंबईने लखनऊला सहजरित्या पराभूत केले.
२१६ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला एकही मोठी भागीदारी करता आली नाही. मार्करम स्वस्तात बाद झाल्यांनतर निकोलस पुरन व मिचेल मार्श यांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही मोठ्या खेळी करता आली नाही. पावरप्लेमध्ये ६० धावा केल्यानंतर त्यांना हवी तशी धावगती राखण्यास यश आले नाही. ठराविक अंतराने गडी बाद होण्याचा क्रम चालू राहिला आणि परिणामी केवळ १६१ धावांत गाशा गुंडाळावा लागला.
मुंबई इंडियन्सतर्फे ट्रेंट बोल्टने आपली जादुई गोलंदाजी पेश केली. त्याला भारताचा सुपरस्टार जसप्रीत बुमराने केवळ २२ धावा देत चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत उत्तम साथ दिली. विल जॅक्सनेही दोन फलंदाजांना एकाच षटकात बाद करीत मुंबईचा विजय सोपा केला.