कसोटी मालिकेत ३-० ने विजय मिळवल्यानंतर विराट सेनाने यजमान श्रीलंकेला एकदिवसीय मालिकेतही ५-० ने पराभूत करीत श्रीलंकेच्या २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या अडचणी वाढवल्या. कोलंबो: जेव्हा तुमचे दिवस खूपच वाईट असतात तेव्हा छोट्या छोट्या संधीही तुम्हाला वाचवत नाही. याचीच प्रचिती श्रीलंका संघाने झालेल्या एकदिवसीय मालिकेत घेतली. आजच्या पाचव्या व शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने आणखी एका दमदार शतकाच्या जोरावर यजमानांना पाणी पाजत मालिका ५-० अशी जिंकली आणि विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी थेट पात्र होण्याच्या अडचणी आणखी वाढवल्या. मालिका सुरु होण्याआधी श्रीलंकेला पाचपैकी किमान दोनतरी सामने जिंकणे आवश्यक होते. परंतु पाचच्या पाच सामने गमावल्यानंतर आता त्यांना याच महिन्यात होणाऱ्या इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. उपुल थरंगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाचीचा निर्णय घेतला खरा, परंतु बचावात्मक सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारणे त्यांच्यात झेपले नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यानंतर फिरकी माऱ्यानेही तितकीच उत्तम साथ दिली आणि त्यातच परिणाम भारताने श्रीलंकेला शेवटच्या षटकात २३८ धावांवर गारद केले. लाहिरू थिरिमने (६७), अँजेलो मॅथ्यूस (५५) यांच्या अर्धशकानंतर श्रीलंका २७०-२७५ धावा करेल असे दिसत होते परंतु शेवटच्या दहा षटकांत केवळ ४९ धावांचा योगदान देत तब्बल ६ गडी गमावण्याची नामुष्की श्रीलंकेवर ओढवली. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने ४२ धावांत ५ बळी टिपत श्रीलंकेचे कंबराटे मोडले. त्याला बुमराने (४५ धावांत २ बळी) योग्य साथ दिली. शिखर धवनच्या जागी सलामीस संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणेला फायदा उचलता आला नाही. त्याचा मुंबईकर साथीदार रोहित शर्माच्या जोडीने डावाची सुरुवात करणाऱ्या या जोडीला केवळ १७ धावाच जमा करता आल्या. मलिंगाने रहाणेला ५ धावांवर बाद करीत भारताला पाहिले धक्का दिला. मागच्या दोन सामन्यांत शतक ठोकणारा रोहित शर्माही राहणे पाठोपाठ १६ धावा करून बाद झाला. आठव्या षटकात भारताची अवस्था २ बाद २९ अशी झाली आणि श्रीलंकेला एका संधीची चाहूल लागली. गरजेच्या वेळी विशेषतः धावांचा पाठलाग करताना कसे खेळायचे हे विराट कोहलीकडून शिकायचे. नाजूक परिस्थितीत नवीन नवीन साथीदारांसोबत महत्वपूर्ण भागीदाऱ्या रचित त्याने संघाला आणखी एक विजय मिळवून दिला. पहिल्यांदा मनीष पांडेसोबत (३६) तिसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची व नंतर त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा साथीदार केदार जाधवसोबत (६३) चौथ्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी रचित विजयावर शिक्कामोर्तब केला. कोहली ११६ चेंडूंत ११० धावा काढत नाबाद राहिला. एकदिवसीय सामन्यात त्याचे हे ३० वे शतक आहे. त्याने याच शतकाबरोबर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगच्या ३० शतकांची बरोबरी केली. आता त्याच्यापुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (४९) आहे.]]>
Related Posts

भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी विजय: वर्चस्वाचा ठसा
संदीपन बॅनर्जी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांची लढत ही केवळ सामने जिंकण्यापुरती मर्यादित नसते, तर ती वारसा घडवण्याचा भाग असते. आयसीसी चॅम्पियन्स…