नवी दिल्ली, दिनांक 18 ऑक्टोबर 2016: सहा गोलांची नोंद झालेल्या रोमहर्षक लढतीत दिल्ली डायनॅमोजने दोन गोलांच्या पिछाडीवरून हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी बरोबरी नोंदविली. त्यांनी मुंबई सिटी एफसीला 3-3 असे रोखले. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पूर्वार्धात यजमान संघ दोन गोलांनी मागे होता. यंदाच्या स्पर्धेतील हा सलग चौथा बरोबरीचा सामना ठरला. जियानलुका झांब्रोटा यांच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली डायनॅमोजने उत्तरार्धात भन्नाट खेळ केला. त्यामुळे मुंबई सिटीचा बचाव कोलमडला. सामना संपण्यास आठ मिनिटे असताना मार्सेलो परेरा याने पेनल्टीवर नोंदविलेला गोल दिल्लीसाठी निर्णायक ठरला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. बरोबरीच्या एका गुणामुळे मुंबई सिटीची आघाडी घेण्याची संधी हुकली. त्यांचे पाच सामन्यांतून आठ गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडच्या तुलनेत मुंबई सिटीचे दोन गुण कमी आहेत. दिल्ली डायनॅमोजने चार सामन्यानंतर गुणसंख्या सहावर नेली आहे. त्यांना आता तिसरा क्रमांक मिळाला आहे. मुंबई सिटीसाठी ख्रिस्तियन वाडोस्झ याने दोन, तर हैतीच्या सोनी नोर्दे याने एक गोल केला. दिल्ली डायनॅमोजसाठी रिचर्ड गादझे, बदारा बादजी व मार्सेलो परेरा यांनी प्रत्येकी एक गोल केला. हंगेरियन मध्यरक्षक ख्रिस्तियन याच्या अचूक नेमबाजीच्या बळावर पूर्वार्धात मुंबई सिटीने दोन गोलांची भक्कम आघाडी मिळविली होती. ख्रिस्तियन याने पहिला गोल 33व्या मिनिटास, तर दुसरा गोल 39व्या मिनिटास नोंदविला. उत्तरार्धात 51व्या मिनिटास घानाचा रिचर्ड गादझे याने दिल्लीची पिछाडी एका गोलने कमी केली. त्यानंतर नोर्दे याने 69व्या मिनिटास मुंबईची आघाडी 3-1 अशी फुगविली. 76व्या मिनिटास सेनेगलच्या बदारा बादजी याने दिल्लीच्या खाती आणखी एका गोलची भर टाकल्यानंतर 82व्या मिनिटास ब्राझीलियन मार्सेलो परेरा याने पेनल्टी फटक्यावर यजमान संघास 3-3 अशी बरोबरी साधून दिली. सामन्यातील अर्ध्या तासाचा खेळ संपल्यानंतर गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटली. लिओ कॉस्ता याच्या कल्पकतेतून हा गोल साकारला. कॉस्ताने अगदी तोलूनमापून वाडोस्झला थेट रेषेतून पास दिला. या मध्यरक्षकाने नंतर गोलरक्षक सोराम पोईरेई याला चकविण्याचे काम पूर्ण केले. आघाडीनंतर सहा मिनिटांनी वाडोस्झ याने दुसऱ्यांदा अचूक नेमबाजी केली. सोनी नोर्दे याने गोलरिंगणाबाहेरून मारलेल्या फ्रीकिकवर चेंडू गोलपट्टीला आपटून रिबाऊंड झाल्यानंतर वाडोस्झने हेडरद्वारे अचूक नेमबाजी केली. विश्रांतीनंतरच्या सहाव्याच मिनिटाला नव्या कल्पनेसह मैदानात उतरलेल्या दिल्लीने पिछाडी कमी केली. यावेळी दिल्लीने डाव्या बगलेतून आक्रमण रचले. फॉरेन्ट मलौडा याने बगलेतून मार्सेलो याला सुंदर पास दिला. मार्सेलो चेंडूसह पुढे गेला. त्याने रिचर्ड गादझे याला चेंडू पास केला. त्यानंतर घानाच्या आघाडीपटूने गोलरक्षक रॉबर्टो नेटोचा बचाव भेदला. यावेळी मुंबईचा मार्सेलो परेरा ऑफसाईड ठरण्याची भीती होती. मुंबई सिटीने 69व्या मिनिटास पुन्हा गोलांची आघाडी मिळविली. बदली खेळाडू ऑक्टेसिलियो अल्विस याच्या सुंदर पासवर सोनी नोर्देस गोल करण्याची संधी लाभली. अल्विसने यावेळी दिल्लीच्या बचावफळीस चकविण्यात मोलाची कामगिरी बजावली. समोर फक्त गोलरक्षक सोराम असताना नोर्देने फटका मारण्यात चूक केली नाही. 76व्या मिनिटाला सेनेगलच्या बदारा बादजी याने दिल्लीची पिछाडी 2-3 अशी कमी केली. यावेळी रिचर्ड गादझे याने मध्यक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला आणि बादजी याच्यासाठी गोल करण्याची संधी प्राप्त करून दिली. समोर फक्त गोलरक्षक रॉबर्टो नेटो असताना बादजीने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली, यावेळी अंतिम क्षणी चेंडू दिशाहीन करण्याचा मुंबई सिटीच्या लुसियान गोईयान याने प्रयत्न केला, परंतु तो विफल ठरला. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीचा बदली खेळाडू जेर्सन व्हिएरा याने गोलरिंगणात दिल्लीच्या रिचर्ड गॅड्झे याला अडथळा आणला. यावेळी रेफरींनी थेट स्पॉट किकची खूण केली. मार्सेलो परेरा याने आरामात गोलरक्षक नेटो याला चकवून दिल्लीचा बरोबरी साधून दिली. सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात मुंबई सिटीचा खेळ लक्षवेधक होता. सहा मिनिटांच्या फरकाने दोन वेळा दिल्लीवर गोल केल्यानंतर त्यांची स्थिती मजबूत झाली होती. 42व्या मिनिटाला पाहुण्या संघास तिसरा गोल करण्याची नामी संधी होती. सोनी नोर्देच्या पासवर लिओ कॉस्ता वेळीच चेंडूवर नियंत्रण राखू शकला नाही. सामन्याच्या 58व्या मिनिटाला मुंबई सिटीच्या सेहनाज सिंग याला यलो कार्ड मिळाले. त्याचे हे स्पर्धेतील चार सामन्यांतील चौथे यलो कार्ड ठरले, त्यामुळे तो पुढील सामन्यास मुकेल.]]>
Related Posts
भारत वि. दक्षिण आफ्रिका: दिग्गजांची ‘विराट’ कामगिरी आणि नव्या युगाचा उदय
Rohit Sharma and Virat Kohli delivered beyond expectations and now step out of the spotlight as attention shifts back to T20Is.
