कोची, दिनांक 14 ऑक्टोबर 2016: मायकेल चोप्रा याने उत्तरार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर यंदाच्या हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सने पहिल्या विजयाची चव चाखली. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांनी मुंबई सिटी एफसीला एका गोलने हरविले. चोप्रा याने 58व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. त्याचा हा यंदाच्या आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. स्टीव कोपेल यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सने मागील लढतीत दिल्ली डायनॅमोजला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यांचे चार सामन्यांतून चार गुण झाले आहेत. त्यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. पराभवामुळे अव्वल स्थान मिळविण्याची मुंबई सिटीची संधी हुकली. त्यांचा हा स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. चार सामन्यानंतर सात गुणांसह त्यांचा दुसरा क्रमांक कायम आहे. स्पर्धेत दोन गोल केलेला मुंबई सिटीचा हुकमी खेळाडू मातियास डिफेडेरिको याला आज केरळाच्या बचावपटूंनी जास्त मोकळीक दिली नाही. केरळा ब्लास्टर्सने नव्वद मिनिटांच्या खेळात अधिकांश वर्चस्व राखले, तुलनेत मुंबई सिटीला छाप पाडता आली नाही. भारतीय वंशाचा ब्रिटिश फुटबॉलपटू मायकेल चोप्रा याने उत्तरार्धातील तेराव्या मिनिटाला गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. त्यामुळे केरळा ब्लास्टर्सला आघाडी घेता आली. केर्व्हेन्स बेलफोर्टच्या “असिस्ट’वर चोप्राने मुंबईचा गोलरक्षक रॉबर्टो नेटो याचा बचाव भेदला. गोलरिंगणात मिळालेल्या चेंडूवर चोप्राने उजव्या पायाच्या फटक्यावर अगदी जवळून नेमबाजी केली. पूर्वार्धातील 45 मिनिटांच्या खेळातही केरळा ब्लास्टर्सचे वर्चस्व राहिले, परंतु त्यांना संधीचे रूपांतर करता आले नाही. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात केरळाचा महंमद रफी दोन वेळा चुकला. तिसऱ्या मिनिटाला केवळ गोलरक्षकाला चकविणे बाकी असताना रफी चेंडूला योग्य दिशा दाखवू शकला नाही. पूर्वार्धाच्या “इंज्युरी टाईम’मध्ये कॉर्नर किकवरील रफीचा हेडर दिशाहीन ठरल्यामुळे गोलशून्य बरोबरी कायम राहिली. चोप्रा व रफी यांनी आक्रमक खेळ करत मुंबई सिटीच्या बचावफळीस चांगलेच सतावले. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटाला केरळाची आघाडी घेण्याची आणखी एक संधी वाया गेली. फ्रीकिकवर जोसू कुरेस याचा फटका भरकटला. 53व्या मिनिटाला पुन्हा एकदा केरळाची सदोष नेमबाजी पाहायला मिळाली. चोप्राच्या पासवर अझरॅक महमत याचा फटका थेट गोलरक्षक नेटोच्या हाती गेला. मुंबई सिटीचा बदली खेळाडू सोनी नोर्दे याने 69व्या मिनिटास जवळपास बरोबरीचा गोल केला होता, मात्र केरळाचा बचावपटू ऍरोन ह्यूज याने ऐनवेळी चेंडू रोखल्यामुळे केरळाची आघाडी सुरक्षित राहिली. नोर्दे याने केरळाच्या संदेश झिंगान याला चकवा देण्यास यश मिळविले होते, नंतर त्याने गोलरक्षक संदीप नंदीलाही गुंगारा दिला होता. नोर्दे मैदानात उतरल्यानंतर मुंबईचे आक्रमण जास्त धारदार झाले. त्यामुळे केरळाच्या बचावफळीवर दबाव आला. नोर्देने 65व्या मिनिटाला लुसियान गोईयान याची जागा घेतली होती. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना कोपेल यांनी गोल केलेल्या चोप्रास विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याची जागा अंतोनियो जर्मन याने घेतली. सामना संपण्यास तीन मिनिटे असताना केरळा ब्लास्टर्सच्या खाती आणखी एक गोल जमा झाला असता, परंतु बेलफोर्ट “ऑफसाईड’ ठरल्यामुळे त्यांची आघाडी एका गोलपुरतीच मर्यादित राहिली. “इंज्युरी टाईम’च्या पाच मिनिटांच्या खेळातही केरळाने आघाडी टिकवून ठेवत विजयाचा जल्लोष केला.]]>
Related Posts
कांगारूंसमोर भारताची नांगी, मालिका गमावली
Fifties from Rohit and Iyer weren’t enough as Short and Connolly led the chase after Zampa and Bartlett shared seven wickets.
