जेतेपद राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज

India Captain Suryakumar Yadav in Press Conference

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी यजमान भारत तर हॉट फेव्हरेट न्यूझीलंड संघ तयार आहेत. २०२४ चा विजेता भारत आपले जेतेपद राखण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

अहमदाबाद (भास्कर गाणेकर): ‘हिस्टरी रिपीट होगी, हिस्टरी डिफिट होगी’ अर्थात इतिहासाची पुरावृत्ती होणार, इतिहास हरणार. या जयघोषाने टी-२० विश्वचषक २०२६ चा ‘ब्रँड अँबेसेडर’ रोहित शर्माने केलेल्या जाहिरातीची आता सांगता करण्याची वेळ आली. आणि मुख्य म्हणजे २०२४ चा विजेता कर्णधार रोहितने आपल्या मुंबईकर सूर्यकुमार यादवला कानमंत्र देत टीम इंडिया आता इतिहासाची पुरावृत्ती करण्यासाठी व इतिहास बदलण्यासाठी केवळ एक रात्र दूर आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मेगा फायनलमध्ये एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत चमचमत्या करंडकावर आपले नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववे पत्रकारांच्या प्रश्नांना मनमुराद उत्तरे देत संघाच्या तयारीविषयी व एकंदरीत माहोलविषयी चर्चा केली.

रोहित शर्माने आपल्या कर्णधाराच्या कारकिर्दीत जे खेळीमेळीचे वातावरण तयार केले होते तेच वातावरण आजही संघात आहे असे सूर्यकुमारने म्हटले. संघात कोणाचा मोठा भाऊ किंवा कर्णधार म्हणून वागणूक दिली जात नाही. जिथे गरज असते तिथे त्या खेळाडूशी बोलले जाते. शिवाय कर्णधार म्हणून प्रत्येक खेळाडूला आनंदित व उत्साहित ठेवण्याचे कामही तो आणि प्रशिक्षक करतात याची कबुली त्याने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०२३ सालच्या एकदिवसीय विश्वचषक फायनलच्या पराभवाला विसरून जात संघाला जेतेपद मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल असेही त्याने केले.

 भारतीय प्रेक्षकांची मने दुखावल्यास फरक पडणार नाही – मिचेल सॅन्टेनर

२०२३ साली पॅट कमिन्सने लाखाहून अधिक भारतीय प्रेक्षकांना स्तब्ध करीत एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याने त्या अंतिम सामन्याच्या आधीही भारतीय प्रेक्षकांना स्तब्ध करणार असे विधान केले होते. असेच काहीसे सूचक विधान न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टेनरने करत जणू भारतीय संघाला व प्रेक्षकांना आव्हान दिले आहे. याच न्यूझीलंडला मागील वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पराभूत करीत विजेतेपद मिळवले होते.

आकडे काय बोलतात?

उभय संघात आतापर्यंत झालेल्या ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताने १६ विजय मिळवेल असून ११ वेळेस किवींनी बाजी मारली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. बरोबरीत सुटलेल्या दोन सामन्यांत भारताने बाजी मारली तर एका सामन्याचा निकाल पावसामुळे लागू शकला नाही. आकड्यांचा विचार केला तर भारत न्यूझीलंडविरुद्ध टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांत पराभूत झाला आहे. २००७, २०१६ व २०२१ साली किवींनी भारताचा पराभव करून दाखवून दिले आहे कि ते टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतापेक्षा वरचढ का आहेत. 

स्पर्धेच्या इतिहासात जरी आकडे भारताच्या बाजूने नसले तरी संघाचा सध्याचा फॉर्म व न्यूझीलंडविरुद्ध घराच्या मैदानावर जिंकली गेलेली मालिका भारतासाठी जमेची बाजू आहे. सांघिक खेळावर भारताने भर दिल्यास भारत न्यूझीलंडला पराभूत करीत चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव करेल यात शंका नाही.