चुरशीची बाजी अखेर भारताची… इंग्लंडचा पराभव करत फायनलचे तिकीट पक्के

India players

तब्बल ४९९ धावांचा आणि ३४ षटकारांचा पाऊस पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा केवळ सात धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

भास्कर गाणेकर / मुंबई: आपले टी-२० विश्वविजेतेपद अबाधित राखण्यासाठी सलग तिसऱ्यांदा इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीची लढत खेळणाऱ्या भारताने अखेर चुरशीच्या सामन्यात बाजी मारत चौथ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. काळजाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात भारताने दिलेल्या २५३ धावांच्या लक्षच पाठलाग करताना इंग्लंडने २४६ धावा करत हाऊसफुल वानखेडेवर प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. जसप्रीत बुमरा व हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १८ वे व १९ षटक किफायती टाकत भारताला अश्यक्य वाटणारा विजय सरतेशेवटी शक्य करून दिला.

वानखेडेची खेळपट्टी जरी धावांचा पाऊस पाडणारी आणि पाठलाग करण्यास पूरक असली तरी भारताच्या, विशेषतः मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना काही नवखी नव्हती. नाणेफेकीचा कौल गमावूनसुद्धा सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाने अगदी पहिल्याच षटकापासून बेधडक सुरुवात करीत संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केले. टी-२० क्रिकेटमध्ये नंबर एकचा फलंदाज अभिषेक शर्मा आज पुन्हा एकदा अपयशी ठरला. टी-२० विश्वचषकाची सुरुवात तीन भोपळे फोडून केल्यानंतरही अद्याप त्याला सूर गवसलेला नाही. विल जॅक्सच्या गोलदांजीवर दोन चौकार लागवल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात डिप मिड विकेटला झेल देत केवळ नऊ धावा करत माघारी परतला. या स्पर्धेत तो तब्बल तिसऱ्यांदा ऑफ-स्पिनर्सच्या गोलंदाजीवर बाद झाला हे विशेष.

संजू सॅमसनने मागील सामन्याचा फॉर्म कायम ठेवत आणखी एक ‘स्पेशल’ खेळी केली. तिसऱ्या षटकात हॅरी ब्रुकने त्याचा सोपा झेल सोडत जीवनदान दिले आणि संजूने मिळालेल्या संधीचे सोने करत केवळ ४२ चेंडूंत आठ चौकार व सात गगनचुंबी षटकार खेचत ८९ धावांची अदभूत खेळी केली. ईशान किशनने त्याच्यासोबत दुसऱ्या गड्यासाठी ४५ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी करत भारताला नवव्या षटकातच शंभरी गाठून दिली. ईशानने १८ चेंडूंत चार चौकार व दोन षटकार ठोकत ३९ धावांची छोटी पण वादळी खेळी केली. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेनेही आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करत २५ चेंडूंत ४३ धावांची आग ओकणारी खेळी केली. यात त्याने चार षटकार खेचले. इंग्लडसाठी स्पिनर्सनी काहीशी कामचलाऊ गोलदांजी केली. जॅक्स व आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन तर जाफ्रा आर्चरला एक गडी बाद करण्यात यश आले. भारताने मागील वर्षी याच इंग्लंडविरुद्ध २४७ धावांचा डोंगर उभारला होता. आज त्याच्याही पलीकडे जात २५३ करत आणखी एक विक्रम केला.

न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात स्थान पक्के करण्याच्या इराद्याने धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात बऱ्यापैकी झाली. पावरप्लेपर्यंत त्यांनी गडी गमावत ६८ धावा करत केल्या होत्या. हार्दिकने फिल सॉल्टला दुसऱ्याच षटकात धाडत भारताला चांगली सुरुवात करून दिली. बुमराने पाचव्या षटकात कर्णधार ब्रुकला बाद करीत आणखी एक धक्का दिला. पुढच्या षटकात लगेचच वरून चक्रवर्तीने जोस बटलरचा (२५) त्रिफळा उडवत गडी बाद केला.

इंग्लंडनेही भारताच्या २५३ धावांना तोडीस तोड उत्तर दिले. एक बाजूने विकेट्स जात होते तर जेकब बेथेल चौकार षटकारांची आतिषबाजी करत होता. केवळ १९ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावत आपले मनसुबे स्पष्ट केले. गोलंदाजीत वारंवार बदल करूनही यश मिळत नव्हते. सहाव्या गड्यासाठी त्याने विल जॅक्ससह केवळ ३९ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपच्या गोलंदाजीवर डीप कव्हरला अक्षरने एक अशक्य असा झेल टिपत जॅक्सला (३५) बाद केले आणि भारतीय चमूत पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आणले.

अगदी १७व्या षटकापर्यंत भारतापेक्षा वरचढ राहिलेला ब्रिटिश संघ सामना जिंकतो कि काय असे चित्र दिसत होते. पण बुमराने टाकलेली १८ वी ओव्हर सामन्याला कलाटणी देणारी ठरली. त्याने केवळ पाच धावा देत दोन्ही बिग हिटर्सना बांधून ठेवले. १९व्या षटकात हार्दिकनेही केवळ नऊ धावा खर्च करत सॅम करनला बाद करत सामना भारताच्या दिशेने पुन्हा एकदा वळवला. शेवटच्या षटकात ३० धावांची गरज असताना अक्षर पटेलले चेंडूं न देता सूर्याने शिवम दुबेला गोलंदाजी देत पहिल्याच चेंडूवर शतकवीर जेकब बेथेलला धावबाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बेथेलमी बाद होण्यापूर्वी विश्वचषक स्पर्धेतील दुसरे वेगवान षटक ठोकत भारताच्या गोलंदाजांची पिसे काढली. दुबेने तीन षटकार खाऊनसुद्ध भारताला सामना केवळ सात धावांनी जिंकून देत फायनल तिकीट पक्के केले.