मुंबई: आगामी ‘टी-२० मुंबई महिला लीग’मधील तीन संघांचे संचलन हक्क (Team Operating Rights) आज निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित करण्यात आले. या लिलावात नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांनी सहभाग घेत मुंबईतील महिला क्रिकेटवर मोठा विश्वास दाखवला आहे.
सर्वाधिक २ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावून पीआरएस इन्फ्राप्रोजेक्ट्स एलएलपी कंपनीने पहिल्या संघाचे हक्क मिळवले आहेत. रोडवे सोल्युशन इंडिया (१ कोटी ९ लाख) आणि वर्ल्ड स्टार स्पोर्टिंग (७९ लाख) यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या संघाची मालकी मिळवली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे हक्क अधिकृतपणे बहाल केले जातील.
या भरघोस प्रतिसादामुळे मुंबईतील महिला क्रिकेटला नवी उंची मिळेल आणि उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास एमसीएचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला. तर, टी-२० मुंबई लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनी हा लीगच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव आणि वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
