मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत -उपमहापौर संजय घाडी

सुवर्ण महोत्सवी दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण समारंभ

मुंबई: मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. ती आपली मराठी माऊली आहे. शिवरायांच्या तलवारीच्या तेजासोबतच मराठी भाषेने स्वराज्याचा स्वाभिमान जपला. आज जगातील पहिल्या १५ प्रमुख भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण मराठी भाषेबद्दल थोडे उदासीन होत आहोत का? असा प्रश्न पडतो. आपण इंग्रजी शिकावी, ती काळाची गरज आहे, पण मराठीचा विसर पडू देऊ नये. आपल्या घरात, व्यवहारात आणि प्रशासनात मराठीचा वापर वाढवणे, हीच कुसुमाग्रजांची आठवण जागवत मराठी भाषा गौरव दिन करणे सार्थ ठरेल. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आणि लवचिक भाषा आहे. मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत आहे. अहिराणी, मालवणी, वन्हाडी, झाडीबोली अशा अनेक बोलींनी मराठीचे अंगण सजलेले आहे. पण आज प्रश्न उभा राहतोय तो मराठीच्या अस्तित्वाचा आणि संवर्धनाचा. केवळ वर्षातून एक दिवस मराठी दिन साजरा करून भाषा टिकणार नाही. त्यासाठी ती रोजच्या जगण्याची भाषा झाली पाहिजे असे उदगार मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी काढले.

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या प्रतिष्ठित ५० व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत मनोरंजनकार का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक नवलाई दिवाळी अंकाचे पारितोषिक कार्यकारी संपादक प्रभू कापसे यांनी पारितोषिक स्वीकारले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक अशोक पाटील, ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते, चंद्रकांतच्या संपादिका श्रीमती निलिमा कुलकर्णी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग, माजी नगरसेवक ऍड मनमोहन चोणकर, ऍड देवदत्त लाड, संजीव गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अशोक पाटील (सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑपेरेशन्स लेक्चलर इंडिया प्रा.लिमिटेड ) यांनी आपल्या भाषणात जीवनाची सुरुवात महापालिका शाळेत मराठीमधून झाली मात्र आज आपला देश तांत्रिकदृष्ट्या सज्ज होण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेत काम करण्याची मला संधी मिळाली आहे. तंत्रज्ञान आणि जगभरात फिरताना इंग्रजीसह इतर भाषांचा सामना करावा लागतो. मात्र जन्मापासून मराठी ही आपल्यात भिनलेली असते. “आई” आणि “मातृभाषा” या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यात कधीही बदलता येत नाहीत. ज्याप्रमाणे आई आपल्याला जन्म देते, तशीच मातृभाषा आपल्याला विचार करायला शिकवते. आज आपण पाहतो की, कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे अनेक मुले मराठी बोलताना अडखळतात किंवा मराठी बोलणे त्यांना कमीपणाचे वाटते. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या झाडाची मुळे खोल असतात, तेच झाड वादळात टिकून राहते. आपली मुळे आपल्या मातृभाषेत आहेत. जगातील अनेक विकसित देश जसे की जपान, जर्मनी, फ्रान्स हे आपली सर्व प्रगती त्यांच्या मातृभाषेतूनच करतात. मराठी भाषेत जी आपुलकी आहे, जी गोडी आहे, ती इतर कोणत्याही भाषेत नाही. साहित्यापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांचे ज्ञान आज मराठीत उपलब्ध आहे. आपण सोशल मीडियावर पोस्ट टाकताना, मेसेज करताना मराठीचा वापर वाढवला पाहिजे. आपली भाषा टिकली तरच आपली संस्कृती आणि परंपरा टिकती. त्यामुळे मराठीचा न्यूनगंड बाळगू नका, तर मराठीचा सार्थ अभिमान बाळगा. मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नाही, ती संस्कारांची भाषा आहे. जेव्हा आपण वैयक्तिक पातळीवर हे बदल करू, तेव्हाच मराठी खऱ्या अर्थाने ‘राजभाषा’ होईल. मराठी ही केवळ कागदावरची भाषा न राहता ती लोकांच्या हृदयातील भाषा झाली पाहिजे.

एक छंद म्हणून अंदाजे १३५० प्रकाशनाचे ३५०० नवे-जुने वेगवेगळ्या दिवाळी अंकांचा संग्रह करून त्यातून महाराष्ट्र सारस्वताच्या प्रांगणात ११७ वर्षाच्या दिवाळी अंक परंपरेचा अमूल्य ठेवा जतन करणारे मनमाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अनिल शिनकर यांना ग्रंथालय चळवळीतील धुरीण दिवंगत दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा सन्मान पुरस्कार देण्यात आला, याचबरोबर ललित सारख्या मराठी साहित्याचा वेध घेणाऱ्या मासिकात साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी हे गेली तीन दशके दरवर्षी दिवाळी अंकात काय वाचाल हा अभ्यासपूर्ण लेख लिहून दिवाळी सणाची चाहूल देत असतात. दिवाळी अंकांच्या परंपरेचा अभ्यासक म्हणून त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामाची दखल घेऊन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने त्यांना सुवर्णमुद्रा जीवन गौरव सन्मान पुरस्कार देण्यात आला.
संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती “वैभवशाली मराठी भाषेचे गद्दार कोण? या राज्यस्तरीय लेख स्पर्धेतील यशस्वी प्रथम क्रमांक अर्णव चव्हाण, द्वितीय क्रमांक मयुर दातार, तृतीय क्रमांक गुरुदत्त वाकदेकर आणि उत्तेजनार्थ म्हणून डॉ.गौतमी अनुप पाटील, सौ.सुनिती सु.काळे, निर्मला गांगुर्डे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला वृत्तपत्र लेखन, दिवाळी अंक संपादक साहित्य, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि दर्जेदार दिवाळी अंक परंपरेच्या जतनासाठी गेली पाच दशके ही राज्यस्तरीय स्पर्धा संघाच्या वतीने सातत्याने आयोजित केली जाते. राज्यभरातून प्रकाशित होणाऱ्या विविध दिवाळी अंकांमधून यंदा ५० व्या स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट आशय संपादकीय दृष्टी, मांडणी आणि साहित्यिक गुणवत्ता या निकषांवर दिवाळी अंकाची म्हणून निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष रमेश सांगळे आणि कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, विजय कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, राजन देसाई, पास्कोल लोबो, रामचंद्र जयस्वाल यांनी विशेष मेहनत घेतली. आभार प्रदर्शन कार्यवाह नितीन कदम यांनी केले.