मुंबई (भास्कर गाणेकर): दहा वर्षांपूर्वी चमचमत्या करंडकावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरलेल्या वेस्ट इंडिजने इतिहास घडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरत सुपर-८ च्या आपल्या पहिल्या लढतीत झिम्बाब्वेचा १०७ धावांनी पराभव करीत सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. प्रथम फलंदाजी करताना शिमरॉन हेटमायर व रोवमन पॉवेल यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर विक्रमी २५५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर अकील हुसेन व गुदाकेश मोटी यांच्या अचूक टप्प्याच्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांना १४७ धावांत गारद करीत सामना सहजरित्या जिंकला. याचबरोबर त्यांनी आपल्या गटातून उपांत्य फेरीसाठी दावेदारी सिद्ध केली.
३९ वर्षांनी झिम्बाब्वेची वानखेडे वारी
पूर्ण सदस्यत्व असूनही कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या झिम्बाब्वेने तब्बल ३९ वर्षानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना खेळाला. १९८७च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताविरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यात त्यांचा संघ खेळाला होता. तर टी-२० विश्वचषक स्पर्धेतही त्यांचा हा वानखेडेवर पहिलाच सामना होता.
२० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत, वानखेडेच्या वेगवान खेळपट्टीवर धावांचा पाठलाग होतो या आशेने सिकंदर रझाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावत वेस्ट इंडिजला फलंदाजीस पाचारण करून जणू कुऱ्हाड आपल्या पायावर मारून घेतली. साखळी सामन्यांत ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेला धूळ चारीत ऐटीत सुपर-८ फेरीत प्रवेश केलेल्या झिम्बाब्वेची हवा ‘बिग हिटर्स’ वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी काढली. ब्रेंडन किंग (९) व शाई होप (१४) या सलामीवीरांनी स्वस्तात माघारी धाडत आत्मविश्वास उंचावलेल्या झिम्बाब्वेला पावरप्लेनंतर मात्र आपल्या गोलंदाजीत सातत्य राखण्यात अपयश आलं.
चौथ्या षटकात १० धावांवर शिमरॉन हेटमायरला जीवनदान मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने केवळ १९ चेंडूंत अर्धशतक झळकावत यंदाच्या विश्वचषकात सर्वात वेगवान ‘हाफ सेंचुरी’ लगावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. हेटमायर ७० धावांवर पोचला असताना त्याला अजून एक जीवदान दिले. डीप-मिडविकेटला फटकावलेला गगनचुंबी फटक्याचा मुसेकिवाला ठीकपणे अंदाज घेता आला नाही आणि एक सोपा वाटणारा झेल सोडला. त्याने बाद होण्यापूर्वी ३४ चेंडूंत सात चौकार व तितकेच षटकार ठोकत ८५ धावांची वादळी खेळी केली. त्याला रोवमन पॉवेलने (५९ धा. ३५ चें. ४ चौ. ४ श.) तिसऱ्या गड्यासाठी ५२ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी करीत वेस्ट इंडिजला अडीचशे धावांचा पल्ला गाठून देण्यास मदत केली. मधल्या फळीत रुदरफोर्ड व रोमारिओ शेफर्ड यांनीही गंगेत हात धुवून घेतले. झिम्बाब्वेचा एकही गोलंदाज म्हणावा तितका प्रभावी दिसला नाही. रिचर्ड गरवा व ब्लेसिंग मुझरबानी यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
याचबरोबर टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात वेस्ट इंडिजने २५४ धावांचा डोंगर उभारत दुसरी सर्वोत्कृष्ट खेळी केली. २००७च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने केनियाविरुद्ध २६० धावांची केलेली खेळी आजही अबाधित आहे.
डोंगराएवढं लक्ष्य पार करण्यास उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरुवातीपासूनच दाणादाण उडाली. दुसऱ्या षटकात मुरुमानीला (१४) फोर्डने माघारी धाडत पहिला धक्का दिला. पुढच्याच षटकात अकील हुसेनने ब्रायन बेनेट (५) व रायन बर्लला शून्यावर बाद करीत अवस्था तीन बाद २० अशी केली. अडीचशेहून अधिकचा पल्ला गाठणे झिम्बाब्वेसाठी अश्यक्यच होते. त्यात टी-२० क्रिकेटमध्ये कसलेल्या वेस्ट इंडिजपुढे निभाव लागणे त्यांच्यासाठी नाहीच्या बरोबर होते. अकील हुसेनला गुदाकेश मोटीने मधल्या षटकांत चार बळी घेत उत्तम साथ दिली. त्याने प्रथम डायन मेयर्स (२८), सिकंदर रझा (२७), तशींगा मुसेकिवा (०) व टोनी मुनयोंगा (१४) यांना माघारी धाडत विंडीजचा विजय निश्चित केला. हुसेनने आपल्या चार षटकांत केवळ २८ धावा देत तीन गडी टिपले. १८व्या षटकात ब्रॅड इव्हान्स (४३ धा. २१ चें. २ चौ. ५ श.) फोर्डने बाद करीत सामना जिंकला.
