१.बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत. -सिझर करायला हवं… ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले, तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला काहीही त्रास होण्याचा प्रश्नच नसतो. वस्तुत: गर्भाशयातील पाण्याच्या डोहात मनसोक्त फिरत असताना बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक प्रसूती होताना हे वेढे प्रसूती समयी जवळ असलेल्या डॉक्टर अथवा परिचारिकेला नेहमीच दिसत असतात आणि बाळाला त्यामुळे कधीही काहीही त्रास होत नाही. २.गर्भाशयातील पाणी कमी झालंय. -गर्भाशयातील पाणी कमी होतंय आणि बाळ कोरडं पडतंय हे सिझरचं दुसरं कारण. हे कारण सुद्धा पहिल्या कारणाइतकंच तकलादू आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांपैकी पहिल्या सात महिन्यात बाळाची वाढ कमी आणि पाण्याची वाढ जास्त असते. या उलट सातव्या महिन्यानंतर गर्भाशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणि पाणी त्याप्रमाणात कमी होऊ लागतं. याचाच साधा अर्थ असा की, गर्भाशयातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया प्रसूतीच्या दोन महिने अगोदर सुरू झालेली असते. बरेचदा, प्रसूतीच्या कळा सुरू होण्यापूर्वी पाणमूठ फुटून गर्भाशयातील बरंच पाणी निघून जातं आणि त्यानंतर २४ तासात नैसर्गिक कळा सुरू होतात. काही वेळा, दिवस उलटून गेल्यावर कळा सुरू करण्यापूर्वी पाणमूठ फोडणं हा पूर्वापार चालत आलेला उपाय आहे. यात अनैसर्गिक असं काहीही नाही. बाळ कोरडं पडेल, हे डॉक्टरांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहरण आहे. या व्यतिरिक्त त्या विधानाला काहीही अर्थ नाही. ३.बाळानं पोटात ‘शी’ केली. -प्रसूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढकलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला, की बाळाला ‘शी’ होणं ही अशीच नैसर्गिक क्रिया आहे. उलट अशी ‘शी’ होणे, हे बाळाचे गुदद्वार आणि आतडी पूर्णपणे विकसित आणि नॉर्मल असल्याचे लक्षण आहे. ही विष्ठा जंतु विरहित असते. त्यामुळे बाळाने अशी ‘शी’ गिळली, तरीही त्याला या ‘शी’ पासून काहीही धोका नसतो. बाळाच्या जन्मानंतर लगेचच सक्शन मशिनने ही ‘शी’ बाहेर काढून टाकण्याची पूर्वापार पद्धत आहे. पण बाळानं पोटात ‘शी’ केली हे कारण सांगून हल्ली सर्रास सिझर केलं जातं. ४.बाळाचे ठोके अनियमित झाले आहेत. -गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर बाळाचा रक्तपुरवठा कमी होत असतो; बाळाचे ठोके अनियमित होत असतात. दोन कळांमधील काळात हा रक्तपुरवठा आणि ठोके पूर्ववत होतात. ही क्रिया बाळाचा जन्म होईस्तोवर चालू असते. कळा सहन करण्याची बाळाची ताकद अमर्यादित असते, हे सत्य प्रसूती प्रक्रियेस मदत करताना मी हजारो वेळा अनुभवलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन दिवस घरी कळा देऊन नंतर माझ्याकडे येऊन नैसर्गिक प्रसूती झालेल्या बाळाची तब्येत आणि रडणं खणखणीत असते. त्यामुळे बाळाचे ठोके अनियमित झालेत असं सांगणं हेदेखील एक फसवं कारण आहे. डॉ. अशोक माईणकर (लेखक सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे येथे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात कामाचा त्यांना ३५ वर्षाहून अधिक अनुभव आहे.) एक सत्य जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी..!]]>