१८५७ च्या उठावाआधी देखील बरेच उठाव झाले, पण काही समोर आले आणि काही गडप झाले. पण तरी देखील इतिहास मात्र यांना विसरला नाही. तो कधी न कधी यांचे स्मरण करून देतोच .
असेच एक अजरामर नाव म्हणजे “उमाजी नाईक”.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना “नाईक” ही पदवी मिळाली होती.
उमाजी हे जन्मापासूनच हुशार , धडधाकट शरीर आणि पराक्रमी होते. “रामोशी हेरकला” ही त्यांनी लहानपणा पासूनच अवघत केली होती. वडील दादोजी नाईक यांच्याकडून तलवार, दांडपट्टा, तिरकमठा, भाला, कुऱ्हाड, गोफण या सर्वाचा अभ्यास त्यांनी केला.
या काळात इंग्रज आपले जाळे देशभर पसरवत होते. बरेच मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे देखील काबीज केले. याच काळात म्हणजे १८०३ मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केले. आणि तेव्हा त्यांनी पुरंदर किल्ल्याचे संरक्षण रामोशी समाजाकडून काढून घेतले आणि आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. त्यात इंग्रजांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले होते. या सर्वांवर उमाजी नाईक बेफान झाले. श्री शिवरायांना आपला आदर्श मानून त्यांनी विठूजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी आणि बाबू सोलस्कर यांना सोबत घेऊन कुलदैवत जेजुरी खंडोबाच्या चरणी शपथ घेतली की, स्वराज्यावर पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करून देणार नाही, आणि इंग्रजांविरुद्ध पहिल्या बंडाची घोषणा झाली.
इंग्रज, सावकार, मोठे वतनदार यांना उमाजी यांनी लुटून गोरगरिबांना मदत केली. स्वराज्याच्या आया-बहिणींवर वाकडी नजर टाकणाऱ्याला उमाजी यांनी चांगलाच धडा शिकवला. उमाजी करत असलेला लढा बघून जनता देखील त्यांच्या सोबत येऊ लागली. त्यामुळे त्यांचा लढा अधिक व्यापक आणि इंग्रजांना तापदायक ठरू लागला. इंग्रजांनी पुरंदर, सासवडच्या मामलेदारला फर्मान सोडले की, उमाजींना कैद करा. म्हणून मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन निघाले आणि पुरंदरच्या पश्चिमेला एका खेड्यात उमाजी आणि इंग्रज यांच्यात मोठे युद्ध झाले. त्यात इंग्रजांना पराभवाला सामोरे जावे लागले. उमाजीने इंग्रज अधिकाऱ्यांची छाटलेली मुंडकी मामलेदाराकडे पाठवली. हे पाहून इंग्रज अधिकच संतापले.
उमाजी आपल्या पाच हजार सैन्यासोबत डोंगरात टोळी करून राहत होते. त्यांच्या मागावर येणाऱ्या इंग्रजी सैन्याला गडावरून गोफणि आणि बंदुका चालवून उमाजीचे सैन्य घायाळ करून पुन्हा पाठवून देई. काहिकांचे प्राण देखील यात गेले. उमाजीने फर्मान पण काढला की, सर्वांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडून द्यावा. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन या परीने लढा द्यावा. त्यांचे खजाने लुटावे, त्यांना शेतसारा देऊ नये, अश्याने त्यांची राजवट लवकरच संपुष्टात येईल आणि एक नविन सरकार उदयास येईल . असा फर्मान काढून एक प्रकारे स्वराज्य स्थापनेचा पुकारच उमाजीने केला.
या सर्व प्रकाराने इंग्रज चांगलेच गडबडुन गेले आणि त्यांनी उमजींची माहिती देणाऱ्यास दहा हजार आणि चारशे बिघे जमीन देण्याचा इनाम जाहीर केला आणि फितुरीला सुरूवात झाली.
काळोजी नाईक आणि नाना चव्हाण इंग्रजांना फितूर झाले आणि उमाजी नाईक यांची सर्व गुप्त माहिती यांनी इंग्रजांना पुरवली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजानी पकडले. त्यांना मामलेदार कचेरीतील एका काळोख्या खोलीत ठेवण्यात आले. तेव्हाच एक अधिकारी मॅकींन टॉस याने महिनाभर त्यांची भेट घेऊन सर्व माहिती लिहून ठेवली.
उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि मग त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यात खडकमाळ आळी येथे मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर गेलेले आणि इंग्रजा विरुद्ध पहिला लढा लढणारे उमाजी नाईक हे पहिले क्रांतिकारी.
अशा या शूरविराला कोटी कोटी प्रणाम. इतिहासात तुम्ही कायम अमर राहाल .
वंदेमातरम….!
संकलन:- आदित्य अनिल जोशी