स्वर्गे अमृताची गोडी.. चाखून पहा ना थोडी.. वाहे फुलांची परडी.. माझी माय ही मराठी….!! किती सुंदर वलय.. जसे देवाचे आलय.. झुले सह्याद्री मलय.. माझी माय ही मराठी….!! किती सांगावी महती.. राकट रांगडी माती.. खेड्यापाड्यातली नाती.. माझी माय ही मराठी….!! जशी दुधातली साय.. तशी मऊ माझी माय.. तिचे वंदितो मी पाय.. माझी माय ही मराठी….!! कवि सुनिलजी पवार यांनी राजभाषा दिनी शेअर केलेली कविता वाचली अन मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” आपली हि मायमराठी शालिवाहन राज्याच्या कालावधी पासून अस्तित्वात असणारी. पण काहीशी दुर्लक्षित, पुढच्या काळात मराठी भाषेला सुगीचे दिवस आणले ते महाराष्ट्रातील अठरापगड जातीतल्या थोर संतांनी, त्या मध्ये “संत ज्ञानेश्वर महाराज सर्वश्रेष्ठ ” ज्ञानेश्वर माऊलींचे मराठी जनतेवर खरच खुप मोठे उपकार आहेत. कुराणात पैगंबराने म्हटले आहे. एकेक जमातीसाठी ईश्वराकडून एकेक प्रेरणास्थान येत असते. मला वाटतें मराठी भाषिकांसाठी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे असे प्रेरणास्थान आहेत. जशी भारतावर तशी मराठी प्रदेशावरही ईश्वराने कृपेची अपार वृष्टि केली आहे. अनेक सत्पुरुष येथें अवतरले आहेत. या सर्वात मराठी भाषेपुरतें बोलायचें तर श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचें स्थान खुप उंचीवर आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संत बहिणाबाई, चोखोबाराय, संत नरहरी सोनार,संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, या सर्वानी आपल्या अभंगातून ओव्या मधुन मराठी भाषेचे महात्म्य सांगितले. आपल्या मातृभाषेचा प्रसार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या मजबुती साठी मराठी भाषेला प्राधान्य देऊन राज्य व्यवहार कोशाची रचना करून मराठी भाषेला मोठेच महत्त्व प्राप्त करून दिले. शिवाजी महाराज यांच्या नंतर संभाजी महाराजांनी देखील याचे महत्व जाणून मराठी भाषेलाच राजकीय भाषेचा दर्जा दिला. स्वातंत्र्य पुर्व काळा मध्ये अनेक युग पुरूषांनी मराठीतचे जतन केले, त्या मध्ये स्वातंत्रवीर सावरकर हे अग्रगणी अनेक हिंदी शब्दांच्या मध्ये बदल करून आपल्या मराठी भाषेला प्राधान्य दिले, (छोटेसे उदाहरण ) पहिला मेयर असा शब्दप्रयोग करायचे त्याचे महापौर असे नामकरण सावरकरांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणी ख-या अर्थाने मराठी भाषा सुद्धा मुक्त झाली. अनेक साहित्यिक पुढे येऊ लागले कथा कादंबरी कविता अशा असे वेगवेगळे प्रकार मराठी साहित्यात जन्म घेऊ लागले. कवि ग्रेस, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वि.स.खांडेकर, शांता शेळके, असे अनेक साहित्यिक जन्माला आले या सर्वानी मराठी भाषेची मनोभावे सेवा केली. असेच एक रत्न महाराष्ट्र पुण्यात २७ फेब्रुवारीस जन्मास आले ते म्हणजे वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) पाचवी मध्ये असतानाच त्यांनी कविता लिहिली ती खुप गाजली तिचे कौतुक झाले. पुढे हेच कुसुमाग्रज मराठी लोकप्रिय कवी, लेखक, समीक्षक, नाटककार, म्हणून अवघ्या महाराष्ट्रात सुपरिचित झाले. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान पाहुन त्यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. पण आता या एकविसाव्या शतकात पुन्हा मराठी भाषा लोप पावत चाललेली दिसत आहे. कि विचारायला नको . अलीकडे मराठी शाळेच्या अनुदानावरून आणि मराठी महापालिका शाळा बंद करण्याच्या विडाच काही राजकीय पक्षाने उचलला आहे. त्या मध्ये खाजगी शाळा अग्रेसर आहेत. त्यातच आपली मराठी माध्यमाची शाळा आणि भाषा ह्या राजकीय उद्देशा पायी भरडून निघाली. सी बी एस ई , आय सी एस ई आणि इंग्रजी माध्यमिक शाळांमुळे आपली मराठी माध्यमिक शाळा आणि मराठी भाषा भरडून निघाली. आपण सर्वांनी याकडे लक्ष देवून आपली मराठी भाषा लुप्त होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या मराठी मायबोलीचा प्रसार करण्यासाठी आपण सर्व मराठी माणसांनी योग्य ती पाऊल उचलली पाहिजे आजच्या काळात इंग्रजी आपण शिकू नका असे मी म्हणणार नाही, पण आपण आपल्या मराठी भाषेला विसरू नका हिच कळकळीची विनंती मी वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्म दिनी व मराठी भाषा दिनी करतो आहे. माझ्या मराठीचे बोल कौतुके परि अमृतातेहि पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन! मुक्तछंद लेखन :- संदिप राक्षे]]>