दिल्लीवरील विजयात चमकले आदित्य तरे व शिवम दुबे भारतीय घरेलू क्रिकेटमध्ये दादा असलेल्या मुंबई संघाने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व दाखवीत येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरच्या दिल्लीवर ४ गडी व ९० चेंडू राखत विजय मिळवून तब्बल १२ वर्षांनी भारताच्या ५० षटकांच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. दिल्लीच्या गोलंदाजांनी छोट्याश्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबईकरांना अक्षरशः रडवले असताना अनुभवी आदित्य तरेचे अर्धशतक व शिवम दुबेची अष्टपैलू कामगिरी मुंबईच्या विजयात महत्वाची ठरली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या मुंबई संघात अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी, पृथ्वी शॉ यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होताच. शिवाय सुर्यकुमार यादव, आदित्य तरे, सिद्धेश लाड, शिवण दुबे यांसारख्या युवा खेळाडूंनीही संघाला संपूर्ण स्पर्धेत वेळोवेळी विजयश्री केले होते. स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या मुंबईने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. धवल कुलकर्णी व तुषार देशपांडे यांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या आघाडीला डोकं वर काढता आलं नाही. गंभीर व उन्मुक्त चंद हि सलामी जोडी पाचव्याच षटकात तंबूत परतल्याने दिल्ली अवस्था खूपच बिकट झाली. आघाडीच्या भेदक माऱ्याला उत्तम साथ दिली दिली ती अष्टपैलू शिवम दुबेने. शिवमने आपल्या दहा षटकांत दोन निर्धाव षटके टाकत केवळ २९ धावांवर दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. धवलने तीन तर देशपांडेने दोन गडी टिपले. दिल्लीसाठी हिम्मत सिंगने सर्वाधिक ४२ धावा केल्या. पवन नेगी (२१) व सुबोथ भाटी (२५) यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर दिल्लीला कसाबसा १७७ धावांचा आकडा गाठता आला. वरिष्ठ व अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईसाठी हे लक्ष्य सोपं आहे असे वाटत होते. परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी काही वेगळेच आखले होते. विस्फोटक पृथ्वी शॉने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार लगावत दमदार सुरुवात केली खरी पण तिसऱ्याच चेंडूवर नवदीप सैनीने त्याचा त्रिफळा उडवीत मुंबईला पहिला धक्का दिला. रहाणे (१०), सूर्यकुमार यादव (४), श्रेयस अय्यर (७) हे पटापट बाद झाल्याने मुंबईची अवस्था चार बाद ४० अशी झाली. खडूस वृत्तीसाठी प्रचलित असलेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी धावून आले ते सिद्धेश लाड व आदित्य तरे. दोघांनी पाचव्या गड्यासाठी शतकीय भागीदारी करीत दिल्लीच्या गोलंदाजांचा अक्षरशः घामटा काढला. आदित्य तरे (७१) बाद झाल्यानंतर शिवम दुबेने सिद्धेशसह उरलेली कसर पूर्ण करीत मुंबईला १२ वर्षांनंतर विजय हजारे करंडकावर आपले नाव कोरू दिले. यापूर्वी मुंबईने अमोल मुजुमदारच्या नेतृत्वाखाली २००६-०७ च्या हंगामात या प्रतिष्ठित करंडकावर आपले नाव कोरले होते. मुंबईने या मोसमात खेळलेल्या एकूण ११ सामन्यांमध्ये एकदाही पराभवाची चव चाखली नाही हे विशेष. ११ सामन्यांमध्ये ९ वेळेस संघाने विजय मिळवला तर उर्वरित दोन समाने काही रद्द झाले होते.]]>