महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाला रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्तांची उपस्थिती !

संघटित लढ्यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करूया ! – श्री. संजय जोशी, राज्य संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महड मंदिर, रायगड:- भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरातील प्राचीन परंपरा बदलण्याचा कोणताही अधिकार नाही. हे सेक्युलर राजकारणी कोणतीही मशीद अथवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणत नाहीत. मग हिंदू मंदिरांच्या संदर्भात हा दुजाभाव का ? मंदिर सरकारीकरणाच्या विरोधातील लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित लढ्यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करूया, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी यांनी केले. ते श्री अष्टविनायक क्षेत्र, श्री गणपती संस्थान, महड येथील विश्वशांती मंगल कार्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त बोलत होते.

या अधिवेशनाचा आरंभ वेदमंत्रपठण करून करण्यात आला. यानंतर महड येथील श्री अष्टविनायक क्षेत्र, श्री गणपती संस्थानच्या कार्याध्यक्षा अधिवक्ता मोहिनी वैद्य, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक (सुश्री) सद्गुरू अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री संजय जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री गणपती संस्थान, महड (श्री अष्टविनायक क्षेत्र), महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समितीद्वारा आयोजित या अधिवेशनाला यावेळी श्री गणपती संस्थान, महाड यांचे विश्वस्त अधिवक्ता विवेक पेठे व श्री. किरण काशीकर आदी मान्यवरांसह रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्त यांच्यासह विविध मंदिरांचे प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते आणि मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते.

अधिवक्ता मोहिनी वैद्य, श्री गणपती संस्थान, महड (श्री अष्टविनायक क्षेत्र) म्हणाल्या की, मंदिर महासंघाचे कार्य पुढे नेऊया ! विचारवंत एकत्र आल्याने संघटन होते. संघटितपणे केलेले कार्य प्रभावी होते. मंदिर महासंघाचे कार्य तळमळीने आणि जोमाने सुरु आहे. हे कार्य पुढे नेऊया अशी विनंती मी मंदिर विश्वस्तांना करते.

यावेळी धर्मादाय ट्रस्ट आणि देखभाल, मुंबई अधिवक्ता स्वाती दीक्षित म्हणाल्या की, मंदिर विश्वस्तांनी सतर्क राहून मंदिराचा कारभार करावा !

मंदिराची भूमि हडप करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अप्रामाणिक सरकारी अधिकारी नियुक्त झाले तर आपोआपच त्या मंदिराच्या जमिनीवर ताबा मिळतो मंदिर विश्वस्तांनी सतर्क राहून मंदिराचा कारभार करावा आणि मंदिर सरकारीकरणातून आपल्या मंदिरांना मुक्त ठेवावे. धर्मादाय ट्रस्ट आणि देखभाल संदर्भातील कायदेशीर बाबींबद्दल मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले की, धर्मांधांचा मंदिर परिसरात होणारा शिरकाव रोखण्यासाठी प्रयत्न करा.

पूर्वीच्या काळात इंग्रज आणि मुघल आक्रमकांनी मंदिर संस्कृती नष्ट करण्याचा, हिंदूंच्या धर्मश्रद्धा संपवण्याचा प्रयत्न केला आणि सध्याच्या काळातही मंदिर, मंदिर संस्कृती, हिंदूंच्या श्रद्धा यांवर आघात होत आहेत. काळ पालटला असला, स्वतंत्र भारतात कायदे लागू झाले असले, तरी मंदिर संस्कृतीवरील आघात थांबतांना दिसत नाहीत. मंदिरांशी संबंधित सेवा आणि व्यवहार यांमध्ये धर्मांधांचा वाढता प्रवेश, मुजोरी अन् सहभाग या गोष्टी चिंतनीय आहेत. हे रोखण्यासाठी आपल्याला मंदिरांविषयी काही योजना आखाव्या लागतील.

या अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील मंदिरांमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणारे धर्मशिक्षण फलक लावणे, मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे यांसह मंदिरे आणि मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित मंदिर विश्वस्तांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *