कर्णधार कोहलीची सर्वोत्तम खेळी, अश्विनचे १२ बळी यांच्या जोरावर इंग्लंडचा केला एक डाव ३५ धावांनी पराभव, मालिकेत घेतली ३-० ने आघाडी. मुंबई(१२ डिसेंबर, २०१६): विराट कोहलीच्या सेनेने आपला दबदबा कायम ठेवत, पाहुण्या इंग्लंडला येथील वानखेडे स्टेडीयमवर एक डाव ३५ धावांनी धूळ चारीत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेऊन मालिका खिशात घातली. कालच्या ६ बाद १८२ धावेवर खेळ चालू करणाऱ्या इंग्लंड संघाने भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनसमोर अक्षरशः नांगी टाकली आणि पाचव्या दिवसाच्या केवळ अर्ध्या तासात इंग्लंडचा संघ १९५ धावा करून बाद झाला. मालिकेत अगोदरच २-० ने आघाडीवर असलेल्या भारताने या सामन्यातही आपला सर्वोत्तम प्रदर्शन केला. इंग्लंडने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडतर्फे पदार्पण करणाऱ्या जेनिंग्सने शतक झळकावत इंग्लंडला ४०० धावांचा पल्ला गाठून दिला. भारताच्या रवी अश्विनने अपेक्षेप्रमाणे चांगली गोलंदाजी करीत ११२ धावांत ६ गडी बाद केले तर जडेजाने अश्विनला चांगली साथ देत १०९ धावांत ४ गडी बाद केले. भारतानेही इंग्लंडला चोख प्रतिउत्तर देत पहिल्या डावात ६३१ धावांचा डोंगर उभारला. भारतातर्फे कर्णधार कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करीत २३५ धावा केल्या तर आपला तिसराच सामना खेळणाऱ्या जयंत यादवने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करीत कसोटीतले पहिले अर्धशतक लगावले. तसेच सलामी फलंदाज मुरली विजयनेही संयमी फलंदाजी करीत भारताने पहिल्या डावात २३१ धावांची मोठी आघाडी घेतली आणि इंग्लंडला मोठ्या अडचणीत टाकले. इंग्लंडची दुसर्या डावाची अडखळत झाली आणि पहिल्याच षटकात जेनिंग्सच्या रुपात पाहुण्यांना भुवनेश्वर कुमारने पहिला धक्का दिला. जो रूटने कर्णधार कुकच्या साथीने धावा करण्याचा प्रयत्न केला परंतु जडेजाने कुकला बाद करीत पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. लगेच जडेजाने मोईन अलीला शून्यावर बाद करीत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या बैस्ट्रोने रूट सोबत चांगली भागीदारी केली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी केली. जयंत यादवने चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रूटला बाद करीत इंग्लंडला मोठा धक्का दिला. अश्विननेही आपली फिरकीची जादू दाखवण्यास सुरुवात केली आणि बेन स्टोक्सला विजयकरवी १८ धावांवर झेलबाद केले. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात अश्विनने बॉलला बाद करीत इंग्लंडला मोठा धक्का दिला आणि दिवसभराचा खेळ संपताच इंग्लंडला ६ बाद १८२ अश्या अवस्थेत आणले. पाचव्या दिवशी अश्विनने एकहातीकिल्ला लढवीत इंग्लंडच्या अवघ्या अर्ध्या तासात ४ विकेट्स घेत दुसरा डाव १९५ धावांवर संपवला. शेवटच्या विकेटसाठी आलेल्या अँडरसनची आणि भारताच्या अश्विनची मध्ये बाचाबाचही झाली. पंच व कर्णधार कोहलीने मध्यस्थी करून दोघांमधील शाब्दिक बाचाबाच थांबवली.भारताने हा सामना एक डाव आणि ३५ धावांनी जिंकला. पहिल्या डावाप्रमाणे अश्विनने याही डावात ६ बळी घेत सामन्यात १२ टिपले. एका सामन्यात १० किंवा अधिक बळी टिपण्याचा पराक्रम अश्विनने आतापर्यंत सात वेळा केला आहे. त्याचे यंदाच्या वर्षातील एकूण ९६ बळीही झाले आहेत. कोहलीच्या शानदार २३५ खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताने या विजयाबरोबर सलग ५ मालिका जिंकण्याचाही पराक्रम केला. शिवाय भारत आपल्या घराच्या मैदानावर मागील १८ सामन्यांत एकदाही पराभूत झाला नाही. भारताची ही आतापार्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई येथे १६ तारखेला होईल. चेन्नई कसोटीसाठी सहा आणि मोहाम्मेद शमी अगोदरच बाहेर झाल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची संधी आहे.]]>