कर्णधार स्मिथ व अजिंक्य राहाणेची अर्धशतकीय खेळीने पुण्याने केला मुंबईच्या १८५ धावांचा पाठलाग. पुणे: जगातील सर्वात महागड्या असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात रायसिंग पुणे सुपरजायंट संघाने बलाढ्य मुंबईचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करीत पुण्याच्या प्रेक्षकांना भरपूर मनोरंजित केले आणि नवखा कर्णधार स्टीव्ह स्मिथने साजेशी खेळी करीत १८५ धावांचे विशाल लक्ष्य केवळ एक चेंडू राखत पार केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या मुंबईने आक्रमक सुरुवात केली खरी परंतु त्यांना ही सुरुवात पुढे नेता आली नाही. रोहित शर्माने पार्थिव पटेल व जोस बटलर यांना सलामीस धाडीत स्वतः तीन क्रमांकावर येण्याचा निर्णय घेतला. दोन्ही सलामीवीरांनी डावाला आकार देण्याच्या प्रयन्त केला परंतु पुण्याच्या गोलंदाजांनी मधल्या शतकांत टिच्चून गोलंदाजी करीत धाव रोखल्या. इम्रान ताहीरने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना तंबूत धाडीत मुंबईच्या डावाला खिंडार पडण्यास सुरुवात केली. तर रजत भाटियाने ताहीरला सुरेख साथ देत धावा रोखण्यास मदत केली. मुंबई १६० धावांचा पल्लाही गाठेल कि नाही असे दिसत असताना हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात अशोक दिंडाची येथेच्छ धुलाई करीत मुंबईला १८४ अश्या समाधानकारक धावसंख्येवर आणून ठेवले. मुंबई इंडियन्सतर्फे बटलरने सर्वाधिक ३८ धाव आलेल्या तर पुण्याकडून ताहीरने २८ धाव देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. दिंडाने शेवटच्या षटकात ३० धावा देत आय. पी. एल. च्या इतिहासात एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे केला. मुंबईकर अजिंक्य रहाणेने मयांक अग्रवालच्या साथीने पुण्याचा डावाचा आरंभ करीत दहाच्या सरासरीने धाव कुटल्या. राहणे तर आज वेगळ्याच मूडमध्ये दिसत होता. एकदिवसीय तसेच टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघातून जवळजवळ डिच्चू मिळालेल्या रहाणेने ३४ चेंडूत ३ षटकार व ४ चौकारांसह ६० धावा कुटल्या. तीन क्रमांकावर आलेल्या स्मिथने आपल्या आवडत्या पुण्याच्या मैदानावर पुन्हा एकदा साजेशी खेळी करत तमाम पुणेकरांना एक वेगळीच मज्जा दिली. स्मिथने ५४ चेंडूत ३ षटकार व ७ चौकार खेचीत नाबाद ८४ धावा करीत शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पोलार्डला षटकार खेचीत विजयावर शिक्का मोर्तब केला. संक्षिप्त धावफलक: मुंबई इंडियन्स १८४/८(२०) – बटलर ३८(१९), हार्दिक पांड्या ३५(१५) । ताहीर ३-२८(४), भाटिया २-१४(३) रायसिंग पुणे सुपरजायंट १८४/३(१९.) – स्मिथ ८४(५४), राहणे ६०(३४) । साऊथी १-३४(४), हार्दिक पांड्या १-३६(४) रायसिंग पुणे सुपरजायंट ७ गडी व १ चेंडू राखून विजयी]]>