शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या ग्रामविकास आघाडीने ९ पैकी ७ जागा जिंकत मिळवले स्पष्ट बहुमत रोहा: येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून पहिल्या गेलेल्या रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत तालुक्यातील भालगाव ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ग्रामविकास आघाडीने शेकापला जोरदार धक्का देत ९ पैकी ७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवत ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला. मागील निवडणुकांत शिवसेना-शेकाप यांच्या युतीने सत्ता स्थापन केली होती तर यावेळेस ऐन निवडणुकांच्या वेळेस शिवसेना-शेकाप युती न होऊ शकल्याने राष्ट्रवादीने हाथ पुढे करीत शिवसेनेबरोबर युती करीत शेकापला सत्तेपासून दूर ठेवले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या रोहा तालुक्यात मागील काही वर्षांपासून शिवसेना व शेकापने बऱ्याच ठिकाणी आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. यंदाची निवडणूकही तिन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई होती. जिल्हात राष्ट्रवादी-शेकाप अशी युती असताना भालगावमध्येही शेकाप युती करेल असे दिसत असताना ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे शक्य होऊ शकलं नाही आणि याची मोठी किंमत शेकापला मोजावी लागली. तर दुसरीकडे शिवसेनेने विकासाचा मुद्दा घेत राष्ट्रवादीबरोबर युती करत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. सेनेच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या निवडणुकांच्या निकालात दिसून आली. शिवाय, युतीची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादीनेही घेतलेली मेहनत या परिणामाअंती दिसून आली. शेकापतील अंतर्गत वाद हेही पराभवाचं मुख्य कारण मानलं जातंय. सरपंच पदाच्या लढतीत ग्रामविकास आघाडीच्या अपूर्वा धामणे (८२६) यांनी शेकापच्या रुपाली खेमन (७०४) यांचा १२२ मतांनी पराभव केला. प्रभाग १ मध्ये माजी सरपंच विनायक धामणे (शेकाप) यांना सुगंधा जाधव (राष्ट्रवादी) यांच्याकडून १४४ मतांनी पराभव पत्करावा लागला. प्रभाग १ मधेच शिवसेनेच्या सलोनी अंबेकर यांचा १८८ मतांनी व राष्ट्रवादीच्या रुचिता पवार यांचा १२६ मतांनी विजय झाला. प्रभाग २ मध्ये शेकापने तीनपैकी दोन जागांवर विजय मिळवला. शिवसेनेच्या प्रदीप कदम यांचा अपवाद वगळता शेकापच्या अश्विनी डिके व सुजाता दिघे यांनी बाजी मारली. प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादीच्या लक्ष्मण मोहिते (३२०) यांनी दगडू मोहिते (१८५) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्याच अशोक बैकर (३१६) यांनी शेकापच्या उमेश धामणे (१७६) यांना धक्का देत पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सीट आणली. तर शिवसेनेच्या अंजली गाणेकर (३०६) यांनी शेकापच्या (२०४) यांना धक्का दिला.]]>