भोपाळ:- चारच काय, पाच गुन्हे असू द्या; पण मला जिंकणारा उमेदवार हवा आहे, असे विधान काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केल्याची एक चित्रफीत सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे. मध्यप्रदेशमधील निवडणुकीच्या तोंडावर प्रसारित झालेली ही चित्रफीत काँग्रेसला अडचणीत टाकणारी आहे. भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही चित्रफीत उघड केली. या चित्रफितीवरून काँग्रेसवर टीका करतांना चौहान म्हणाले, ‘‘काँग्रेसचे असेच राजकारण असेल, तर जनतेला सर्व ठाऊक आहे. २८ नोव्हेंबरला कुणाला मतदान करून निवडून द्यायचे, याचा निर्णय जनताच घेईल.’’ भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ‘‘गुन्हेगारांना राजकारणात प्रोत्साहन मिळावे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस अस्वस्थ झाली आहे, हेच यावरून दिसून येते.’’ केवळ काँग्रेसकडून नव्हे, तर भाजपकडून अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचा इतिहास आहे. त्याविषयी पात्रा यांना काय म्हणायचे आहे हा देखील भाजप नेत्यांसाठी आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा प्रश्न आहे. शेवटी सत्तेच्या सिंहासनावर कुणाला बसवायचे हे जनताच ठरवीत असते हे ही तितकेच सत्य आहे.