लंडन: ३० मे रोजी चालू झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही सांगता उद्या यजमान इंग्लंड व न्यूझीलंड यांच्या महामुकाबल्याअंती होणार आहे. ४७ सामन्यानंतर क्रिकेटला उद्या एक नवा ‘चॅम्पियन’ मिळणार आहे. लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर हा मुकाबला रंगणार आहे. इंग्लंड १९९२ नंतर पहिल्यांदाच फायनल खेळेल तर भारताला उपांत्य फेरीत पराभूत करून फायनलमध्ये पोचलेला न्यूझीलंड आपली दुसरी फायनल खेळेल.
१९९२ विश्वचषकाच्या फॉरमॅटनुसार खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीत पोचले होते. पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला एकतर्फी मुकाबल्यात आठ गड्यांनी मात दिली होती. उद्या होणाऱ्या या सामन्यात कोण कोणावर भारी पडतं यावर नजर असेल. साखळी सामन्यांत इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ धावांनी पराभव केला होता.
लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा विचार केला तर इथली खेळपट्टी ही हिरवी आहे. म्हणजेच या खेळपट्टीवर गोलंदाज हावी होताना दिसतील. आज खेळपट्टीचा पाहणी केली असता जवळपास सर्वच खेळपट्टी ही गवताने भरलेली दिसून आली. साखळी सामन्यांत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी येथे दोन वेळेस तीनशेच्या पल्ला गाठला गेला आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात २८५ धावांची मजल मारली होती. त्यामुळे हिरव्या खेळपट्टीवर किती धावा होतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यांच्या कामगिरीवर असणार नजर
उद्याच्या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड दिसत आहे. तब्बल चार शतकीय सलामी भागीदारी दिलेल्या जॉनी बेएरेस्टो व जेसन रॉय किवींच्या स्विंग गोलंदाजीचा सामना करण्यास सज्ज आहेत. शिवाय तिसऱ्या क्रमांकावर जो रूटही आपली भूमिका निभावण्यास सक्षम आहे. मधल्या फळीत स्टोक्स, मॉर्गन हेही फटकेबाजी करण्यात माहीर आहेत. तर न्यूझीलंड संघाचा विचार केला असता कर्णधार केन विलियम्सनचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना म्हणावी तितकी फलंदाजी करता आलेली नाही. उद्या रॉस टेलर, मार्टिन गप्टिल यांना मोठी खेळी करून संघाला सावरावे लागेल.
गोलंदाजीत इंग्लड संघ परिपक्व दिसत आहे. जोफ्रा आर्चर, मार्क वुड, ख्रिस वोक्स यांचा भेदक मारा न्यूझीलंडला भारी पडू शकतो. शिवाय, घराच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात इंग्लंड आपल्या घराच्या परिस्थितींचा फायदा घेऊ शकतो. न्यूझीलंडने बरेचसे सामने गोलंदाजीच्या जोरावर जिंकले आहेत.. लोकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री यांचा भेदक मारा इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरू शकतं.
पाचव्यांदा होणार लॉर्ड्सवर फायनल
लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्सवर उद्या होणारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हि तब्बल पाचवी फायनल होणार. मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड (२) सोडला तर कोणत्याही ग्राउंडवर एकापेक्षा जास्त अंतिम फेरीचा सामना रंगलेला नाही. १९७५, १९७९, १९८७ व १९९९ असे चार अंतिम सामने यापूर्वी लॉर्ड्सवर रंगले आहेत.
]]>