लंडन: क्रिकेट किती ‘वाईट’ खेळ असू शकतो याचा अनुभव आज जगभरातील करोडो चाहत्यांनी घेतला. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या महासंग्रामाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा तर सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरने झालेला सामनाही बरोबरीत सुटल्याने निकाल शेवटी सामन्यातील चौकारांच्या आधारे. अर्थातच, न्युझीलंडच्या १६ चौकारांच्या तुलनेत इंग्लंडचे २४ चौकार भारी पडले आणि पहिल्यांदाच विश्वविजेता ठरला. १९९२ नंतर पाहिल्याचं फायनलची चव चाखलेल्या इंग्लंड संघाने आता मात्र आपल्या प्रेक्षकांना निराश केले नाही. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात रंगलेल्या या महासंग्राम इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करीत चकचकत्या करंडकावर आपले नाव करीत इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात एक नवी आख्यायिका लिहिली.
आज सकाळी लंडनमध्ये पाऊस पडल्याने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं नाणेफेक १५ मिनिटे उशिरा झालं. केन विलियम्सनने येथेही बाजी मारत प्रथम फलंदाजी स्वीकारली. थोडंसं ओलं आऊटफिल्ड असल्यामुळे न्यूझीलंडचा हा निर्णय चुकीचा ठरतोय कि काय असेच वाटत होते. मागच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा मार्टिन गप्टिलने (१८) आज थोडीशी आक्रमक सुरुवात केली. थोडासा लयमध्ये दिसला असताना वोक्सने त्याला पायचीत पकडीत मोठा अडथळा दूर केला. कर्णधार विलियम्सनने हेन्री निकोलससह ७४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला.
क्रिकेटच्या महासंग्रामाच्या अंतिम सामन्याचा दबाव दोन्ही संघांवर दिसून येत होता. न्यूझीलंडच्या आघाडीसह मधल्या फळीनेही सावध पवित्रा घेतल्यानंतर धावफलकावर किती धावा होतील याची उत्कंठा प्रेक्षकांना होती. विलियम्सनने आपला फॉर्म जारी ठेवत ३० धावांचं योगदान दिलं. तर निकोलसने (५५) किवींच्या डावातील एकमेव अर्धशतक लगावले. टीम लॅथमने (४७) थोडीशी फटकेबाजी करीत न्यूझीलंडला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी आजही सुरेख गोलंदाजी करीत प्रेक्षकांना चांगलीच पर्वणी दिली. न्यूझीलंडने आठ गडी गमावत २४१ धावा उभारल्या. ख्रिस वोक्स व प्लंकेट यांनी प्रत्येकी तीन तर जोफ्रा आर्चर व मार्क वुड यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
पंचांची सुमार कामगिरी
आयसीसी विश्वचषकाच्या फायनलसारख्या मोठ्या सामन्यात पंचांच्या खराब कामगिरीचा अनुभव खेळाडूंसह प्रेक्षकांनाही आला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जेसन रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद देत चर्चेत आलेले कुमार धर्मसेना व मरेस इरासमस यांच्या खराब निर्णयाचा फटका न्यूझीलंडला बसला. किविंच्या डावात तब्बल तीन चुकीचे निर्णय या दोघा पंचांनी दिले. धर्मसेनाने दोन तर इरासमस यांनी एक चुकीचा निर्णय दिला. रॉस टेलरचा निर्णय न्यूझीलंडला खूपच महागात पडला. अन्यथा, किवींचा स्कोर अडीचशेच्या पार झाला असता.
मर्यादित क्रिकेटमध्ये भागीदारी किती महत्वाची असते याची प्रचिती आज इंग्लंड संघाला आली. २४२ धावांचं पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात काहीशी अडखळत झाली. जेसन रॉय (१७), जो रूट (७), जॉनी बेएरेस्टो (३६) व कर्णधार इऑन मॉर्गन (९) हे ठराविक अंतरावर बाद झाल्याने छोटासा वाटणारा धावांचा पाठलाग इंग्लंडसाठी कठीण होऊन बसला. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी इंग्लंडला तारले. जोस बटलर (५९) व बेन स्टोक्स (नाबाद ८४) यांच्या पाचव्या गड्यासाठीची ११० धावंची भागीदारी इंग्लंडला पुन्हा खेळात घेऊन आली. पण आज लॉर्डसच्या प्रेक्षकांना काहीतरी नवीनच पाहायला भेटले. १० षटकांत ७२ धावा व सहा गडी बाकी असताना कोणी विचारही नसेल केला ही सामना बरोबरीत सुटेल. लोकी फर्गुसनने आपली चतुर गोलंदाजी शेवटच्या षटकात १५ धावांचं समीकरण आणलं. पहिल्या दोन चेंडूंवर एकेरी धाव मिळाल्यानंतर स्टोक्सने तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटला षटकार भिरकावत सामन्याची गणितेच फिरवली. खरी गम्मत चौथ्या चेंडूवर आली. स्टोक्सने दोन धावा घेतल्यानंतर गप्तीलने मिड विकेटवरून किपरकडे केले थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेकडे गेला आणि सामनाच फिरवला. दोन चेंडूंत तीन धावांची आवश्यकता असताना दोन्ही चेंडूंवर दुहेरी धावा घेताना खेळाडू धावबाद झाले आणि विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम सामना पहिल्यांदाच बरोबरीत सुटला.
सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने
इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या बरोबरीच्या अंतिम सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. इंग्लंडची शतकीय भागीदारी केलेली जोडी मैदानात उतरत न्यूझीलंडच्या सर्वात अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टवर तुटून पडली. या दोघांनी दोन चौकार ठोकत तब्बल १५ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १६ धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडने जिमी निशम व मार्टिन गप्टिल जोडीला मैदानात धाडत फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा भेटल्यानंतर निशमने जाफ्रा आर्चरचा तिसरा चेंडू मिड विकेटला भिरकावत षटकार ठोकला. पुढच्या दोन चेंडूंवर पुन्हा दोन-दोन धावा घेत शेवटच्या दोन चेंडूंवर तीन धावा असे समीकरण आणले. पाचव्या चेंडूवर एक धाव घेत शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेताना जेसन रॉयने अप्रतिम थ्रो करीत मार्टिन गप्तीलला धावचीत केले आणि इंग्लंडने या ड्रामेबाज फायनलमध्ये बाजी मारत पहिल्यांदाच चॅम्पियन बनला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड: २४१/८ (५०) – मार्क निकोलस ५५ (७७), टॉम लॅथम ४७ (५६), ख्रिस वोक्स ९-०-३७-३
इंग्लंड: बेन स्टोक्स ८४ (९८), जोस बटलर ५९ (६०), जिमी निशम ७-०-४३-३
सामना बरोबरीत, इंग्लंड सुपर ओव्हरच्या आधारे विजयी
]]>