अलिबाग : मुरुड शहराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सध्या नादुरुस्त असल्याने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकत नाही. तातडीने शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्र तात्काळ दुरुस्त करुन मुरुडवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, तसेच तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा, असे निर्देश राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिले. मुरुड तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह मुरुड येथे गुरुवारी (दि.४) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती स्नेहा पाटील, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागचे कार्यकारी अभियंता आर.एस.मोरे, मुरुडचे तहसिलदार उमेश पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, मुरुड तालुक्यातील शहरी भागात व ग्रामीण भागात असलेल्या अनेक समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या – त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी संबंधित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. पाणी ही नागरिकांची अत्यावश्यक सेवा असून मुरुड शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांनाही योग्य ती सेवा आरोग्य विभागाने द्यावी. तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत तालुक्यात करण्यात येणारे रस्ते, पूल यांचीही कामे अपूर्ण असल्यास तीही पूर्ण करावीत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य कार्यवाही करुन ते काम पूर्ण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्या असे निर्देशही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले. साभार: महान्यूज]]>