सुनील छेत्रीचे दोन गोल, त्यात मिकूने केलेला फ्री-किकवरील गोल ठरला मुंबईच्या सलग पराभवच कारण नॉर्थईस्ट युनायटेडला २-० ने आणि दिल्ली डायनॅमोसला ४-० ने दणका देत आत्मविश्स्वास उंचावलेल्या मुंबई सिटी एफ. सी. ला आज पुन्हा एकदा आपल्या घराच्या मैदानावर बेंगळुरू एफ. सी. संघाकडून मोठा पराभव मिळत अंतिम चार मध्ये जाण्याचा मार्ग आणखी खडतर झाला. सुनील छेत्रीचे दोन गोल तर मिकूचा एक गोल यांच्या जोरावर बेंगळुरूने मुंबईचा ३-१ असा दारुण पराभव केला. नाट्यमय पहिला हाफ बंगळुरूचा आपल्या पूर्वीच्या संघाविरुद्ध दोन हात करण्यास उतरलेल्या भारताचा तसेच बेंगळुरू एफ. सी. संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सर्व ताकतीनिशी अंधेरीच्या मुंबई फुटबॉल अरेनावर सुरुवातीपासूनच मुंबईवर दवाब टाकण्यास सुरुवात केली. यंदाच्या मोसमात तब्बल आठ गोल करीत सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला मिकू व अनुभवी उदांता सिंग असा भरणा असलेला बेंगळुरू एफ. सी. संघ आज एक वेगळ्याच फॉर्मात दिसत होता. एकीकडे बेंगळुरू आपल्या आक्रमकतेवर भर देत होता तर दुसरीकडे मुंबईही आपला बचाव अप्रतिमरीत्या करताना दिसला. दरम्यान १९ व्या मिनिटाला मुंबई सिटी एफ. सी. चा कर्णधार लुसियान गोयानला छोटीसी दुखापत झाली. परंतु तातडीने मिळालेल्या वैद्यकीय मदतीनंतर तो पुन्हा आपल्या संघाच्या मदतीस कामी आला. तर २५ व्या मिनिटाला उदांता सिंगच्या पासवर सुनील छेत्रीने एक सुरेख प्रयत्न केला, परंतु मुंबईचा गोलकिपर अमरिंदरच सिंगचा तितकाच चांगला बचाव पाहावयास मिळाला. पहिल्या हाफच्या अगदी ३५ मिनिटांपर्यंत दोन्ही संघ अगदी बरोबरीने चालले होते. परंतु शेवटच्या दहा मिनिटांत खेळाने नाट्यमय वळण घेतले. नाट्यमय घटनेत सुरुवातीला मुंबईचा स्टार फॉरवर्डर बलवंत सिंगला त्याचे आक्रमण अंगलट आले आणि सामन्यातील पहिले यलो कार्ड मिळाले. लगेच दोन मिनिटांनी बंगळुरूच्या इरिक परतलुने मुंबईच्या खेळाडूला दिलेल्या धडकेमुळे सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाले. लगेच ४२ व्या मिनिटाला बोइथान्ग हाकिपच्या पासवर सुनील छेत्री गोल करणार इतक्यात पेनल्टी भागात मुंबईच्या खेळाडूंकडून चुकीच्या रीतीने पाडण्यात आले. पंचांनी लगेच बंगळुरूला पेनल्टी घोषित केली. पंचांच्या या निर्णयावर मुंबईचा गोलकिपर अमरिंदर सिंगने मोठा आक्षेप घेत वाद केला. परिणाम, त्यालाही पंचांनी यलो कार्ड देत मुंबईला आणखी गोच्यात आणले. मिळालेल्या पेनल्टीचा सुनील छेत्रीने पुरेपूर फायदा घेत पहिल्या हाफला दोन मिनिटे शिल्लक असताना गोल चढवीत बंगळुरूला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. आकडेवारीचा विचार केला तर पूर्वार्धात जिथे दोन्ही संघ ३०-३५ मिनिटांपर्यंत बरोबरीने चालले होते तिकडे शेवटच्या १०-१५ मिनिटांत बेंगळुरू एफ. सी. संघाने मुंबईला खूपच मागे टाकले. मुंबईच्या १६५ पासेसच्या विरुद्ध बेंगळुरूने २३५ पासेस केले. चेंडूवर ताबा मिळवण्याचा विचार केला तर याही ठिकाणी बेंगळुरू आघाडीवर होता. बेंगुळुरूचा फ्री-किक गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या बेंगळुरू एफ. सी ला पूर्वार्धातील मिळालेली आघाडी उत्तरार्धातही कामी आली. सुनील छेत्रीने दुसऱ्या हाफमध्येही आपले आक्रमण ना केवळ चालू ठेवले तर ते आणखी आक्रमक केले. याचाच परिणाम कि काय, ५२ व्या मिनिटाला उदांता सिंगच्या एका पासवर सुनील छेत्रीने अमरिंदर सिंगल चकमा देत सामन्यातील दुसरा गोल देत मुंबईची साफ हवाच काढून टाकली. आपल्या घराच्या मैदानावर यंदाच्या मोसमातील मुंबई सिटी एफ. सीचा खेळ म्हणावा तसा झाला नाही आणि त्याच्यात पुरावृत्ती येथे पाहायला मिळाली. पहिला हाफमध्ये थोडासा दुखापत ग्रस्त झालेला मुंबई सिटी एफ. सीचा कर्णधार गोयान ५७ व्या मिनिटाला मैदानाबाहेर गेला आणि त्याच्या जागी मुंबईने ब्राझीलच्या लियोनार्डो दा कोस्टाला मैदानात उतरवले. मुंबईने जिकडे आक्रमक खेळ दाखवून बंगळुरूला दबावात टाकणे अपेक्षित होते तिकडे मात्र मुंबईच्या आक्रमक फळीने आपली सुमार कामगिरी पुन्हा एकदा दाखवली. मागच्या घराच्या सामन्यातही मुंबईने ज्या चुका केरला ब्लास्टर्स संघाविरुद्ध केल्या होत्या त्याच चुका आजच्या सामन्यातही पाहायला मिळाल्या. बलवंत सिंगची सुमार कामगिरीही यात भरीला पडली. परिणाम पुन्हा एकदा समोर. ६१ व्या मिनिटाला बंगळुरूला पेनल्टीच्या जवळच एक फ्री-किक मिळाला आणि बरोबर प्लान आखून छेत्री आणि कंपनीने मिकूकरवी गोल करीत आघाडी ३-० अशी भक्कम केली. मिकूचा या मोसमातील हा नववा गोल ठरला. शेवटच्या काही मिनिटांत मुंबईने सामन्यात पुनरागमन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु कर्णधार बाहेर असल्यामुळे त्यांना पाहिजे तसा खेळ दाखवता आला नाही. ७६ व्या मिनिटाला बलवंत सिंगच्या पासवर ब्राझिलियन लियोनार्डो कोस्टाने गुरप्रीत सिंग संधूला चकमा देत मुंबईचं खातं उघडलं. परंतु अगोदरच उशीर झाल्यामुळे मुंबईला पुनरागमन करता आलं नाही आणि याचाच परिणाम मुंबईला सामना ३-१ अश्या फरकाने गमवावा लागला. मुंबईचा घराच्या मैदानावर हा सलग दुसरा पराभव आहे. तर दुसरीकडे बेंगळुरू एफ. सी. संघ या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला. अंतिम निकाल: मुंबई सिटी एफ. सी. : १ बेंगळुरू एफ. सी. : ३]]>