भारताच्या २८५ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या हॉंगकॉंगने मजबूत दीड-शतकीय सलामी भागीदारी रचित भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. दुबई: संघाचा शेवटचा एकदिवसीय सामना. पुढे एकदिवसीय सामान्यांची मान्यता कधी मिळेल हे माहित नाही. विरुद्ध तगडा भारतीय संघ. अशी चित्र-विचित्र परिस्थिती असतानाही हॉंगकॉंग सारख्या दुबळ्या संघाने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला चांगलाच घाम फोडला. २८६ धावांचं लक्ष्य पार करण्यास उतरलेल्या हॉंगकॉंगने आपल्या निर्धारित ५० षटकांत आठ गडी बाद २५९ धावांपर्यंत मजल मारली व भारताने सामना केवळ २६ धावांनी जिंकला. भारताला २८५ धावांवर रोखल्यानंतर पाठलाग करण्यास उतरलेल्या निझाकत खान व अंशुमन रथ या सलामी जोडीने सावध पवित्रा घेत भारताच्या प्रत्येक गोलंदाजाला पारखले. एकेरी-दुहेरी धावेवर भर देत दोघांनीही छोट्या-छोट्या भागीदाऱ्या रचल्या. पहिल्या पावरप्लेमधे बिनबाद ५६ धावसंख्या उभारल्यानंतर या जोडीने १८ व्या षटकातच संघाला शंभरी गाठून दिली. भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांना सुरेखरित्या खेळून काढत रोहित शर्माला चांगलेच अडचणीत आणले. भारताची एकदिवसीय संघातील भरवशाची फिरकी जोडी कुलदीप यादव व चहल हेही हॉंगकॉंगच्या सलामीवीरांना रोखण्यात कशी अंशी कमी पडले. भारताला पहिला गडी बाद करण्यासाठी तब्बल ३५ व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. कुलदीपने टाकलेला एक फुलर लेन्थचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याच्या नादात अंशुमन रथ एक्सट्रा कव्हरला उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे सोपा झेल देत तंबूत परतला. पुढच्याच षटकात एकदिवसीय संघात पदार्पण करणाऱ्या खलील अहमदने दुसरा सलामीवीर निझाकत खानला पायचीत पकडत हॉंगकॉंगला दुसरा धक्का दिला. या दोन सलगच्या धक्क्यांतून सावरणे हॉंगकॉंगला शेवटपर्यंत कठीण गेले आणि परिणामी २६ धावांनी पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत दुबईच्या उष्ण हवामानात हॉंगकॉंगने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्माने आपला जोडीदार शिखर धवनच्या साथीने डावाला आक्रमक सुरुवात दिली. परंतु मिळालेल्या चांगल्या सुरुवातीला आठव्या षटकात ब्रेक लागला. मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित २३ धावा काढून तंबूत परतला. यो-यो टेस्ट मुळे इंग्लंड दौरा मुकलेल्या अंबाती रायडूने मात्र येथे मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण एकदिवसीय संघात का पात्र आहोत हे दाखवून दिले. त्याने दुसऱ्या गड्यासाठी धवनच्या साथीने ११६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. दिनेश कार्तिकनेही ३३ धावांचं योगदान देत एका मोठ्या धावसंख्येकडे कूच केली. शिखर धवनने १२० चेंडूंचा सामना करीत १५ चौकार व दोन षटकार खेचत १२७ धावांची खेळी करीत आपले १४ वे एकदिवसीय शतक झळकावले. मिळालेल्या चांगल्या सुरुवातीला मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारत केवळ २८५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या दहा षटकांत तर भारताने केवळ ४८ धावा केल्या त्याही पाच गड्यांच्या मोबदल्यात. भारताचा पुढील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध बुधवारी याच मैदानावर होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल नंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान या उभय संघात लढत होईल.]]>