विधानपरिषदेची द्वैवार्षिक निवडणूक ठाणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या जागेसाठी ३ जून २०१६ रोजी मतदान होत असून ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादमही उपस्थित होत्या. सध्या विद्यमान सदस्य वसंत शंकर डावखरे यांची मुदत ८ जून २०१६ रोजी संपत आहे. १० मे रोजी यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिध्द केले जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत १७ मे असून १८ मे रोजी अर्जांची छाननी होईल. २० मे ही अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असेल. ३ जून रोजी मतदान होऊन ६ जून रोजी मतमोजणी होईल. या कालावधीत मंत्री किंवा राजकीय नेत्यांना या मतदारसंघाच्या क्षेत्रात उद्घाटन, शिलान्यास करता येणार नाही. शासकीय दौरे आणि निवडणूक विषयक भेटी-दौरे-बैठका याची सांगड घालता येणार नाही. या मतदारसंघातील मतदारांवर प्रभाव पडेल असा कुठलही धोरणात्मक कार्यक्रम, निर्णय , नवी घोषणा करता येणार नाही. कोणत्याही मंत्र्यांनानिवडणूक कामाशी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास या मतदारसंघातील कामाविषयी बैठकीस बोलविता येणार नाही. लाल किंवा कोणत्याही रंगाचे दिवे असलेल्या पायलट कारच्या वापराविषयी व सायरन विषयी देखील काही निर्बंध निवडणूक आयोगाने घातले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापौर, नगराध्यक्ष, पदाधिकारी यांना देखील या कालावधीत शासकीय वाहनांचा वापर करण्यावर मर्यादित प्रतिबंध आहे. केवळ कार्यालायाहून घरी जाणे येणे एवढाच उपयोग करता येईल. शासकीय किंवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करता येणार नाही, असेही भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. www.eci.nic.in या संकेतस्थळावर याविषयीची विस्तृत माहिती मिळू शकेल. सुमारे १०५८ मतदार या निवडणुकीत असतील. मतदान केंद्रांची संख्या तसेच यादी नंतर प्रसिध्द केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ६ पालिका, २ नगरपालिका, २ नगर पंचायती तर पालघर जिल्हा परिषद, वसई-विरार पालिका, पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषदा यातील सदस्य हे मतदार आहेत. साभार: महान्यूज]]>